अजित पवारांचा गट मोठा धमाका करण्याच्या तयारीत ? मातब्बर नेत्याला आपल्या गटात खेचून आणण्याच्या हालचाली 

Mumbai – राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपाचे धक्के केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर सर्वच प्रमुख पक्षांना अजूनही बसत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार,  शरद पवार गटाचे जयंत पाटील यांना आपल्या गटात खेचून आणण्याच्या हालचाली अजित पवार यांच्या गटाने सुरू केल्या असल्याची खात्रीलायक माहिती आहे. यासंदर्भात प्राथमिक चर्चाही झाली असल्याचे समजते.

पाटील यांनी या हालचालींना अद्याप अपेक्षित प्रतिसाद दिलेला नाही.शरद पवार यांच्या सोबतच राहण्याची भूमिका ते घेत आहेत तरीही त्यांचे मन वळविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पाटील यांनी जर पवारांची साथ सोडली तर हा त्या गटासाठी मोठा धक्का असू शकतो.