‘संघ फायनलच्या लायकीचा नव्हता’, लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरची टीम इंडियावर टीका

ऍडलेड| भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी (१० नोव्हेंबर) १३० कोटी भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा केला. इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरी (SemiFinal) सामन्यात भारताला १० विकेट्सने लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. यासह पुन्हा एकदा भारताची टी२० विश्वचषक ट्रॉफीची प्रतिक्षा लांबली आहे. भारताने एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली २००७ मध्ये शेवटचा टी२० विश्वचषक जिंकला होता.

भारतीय संघाच्या या मानहानिकारक पराभवानंतर क्रिकेटविश्वातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. अशातच भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान संंघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने पराभवानंतर भारतीय संघावर जहरी टीका केली आहे. भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या पात्रतेचा नव्हता, असे त्याने म्हटले आहे. शोएब अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलत होता.

“भारताने अतिशय घाणेरडा खेळ केला आहे. ते उपांत्य सामना गमावण्यास पात्र होते. भारताने अतिशय घाणेरड्या पद्धतीने फटके खाल्लेले आहेत. त्यांची गोलंदाजी अतिशय वाईट पद्धतीने जगासमोर आली आहे. त्यांच्याकडे खूप चांगले आणि परिस्थितीनुसार गलंदाजी करणारे वेगवान गोलंदाज आहेत, स्थिती चांगली असेल तरच ते चांगली गोलंदाजी करतात. भारताकडे अतिरिक्त वेगवान गोलंदाज नाहीत. युझवेंद्र चहल हा त्यांचा योग्य फिरकी गोलंदाज आहे, पण त्याला का खेळवत नाहीच हे त्यांनाच माहिती. भारताची संघनिवड अतिशय गोंधळात टाकणारी होती,” असे शोएब अख्तर बोलला.