पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी उडवली भारताची खिल्ली, इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर म्हणाले…

ऍडलेड| भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी (१० नोव्हेंबर) १३० कोटी भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा केला. इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरी (SemiFinal) सामन्यात भारताला १० विकेट्सने लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. तर इंग्लंडचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला असून १३ नोव्हेंबरला पाकिस्तानशी भिडेल. यासह पुन्हा एकदा भारताची टी२० विश्वचषक (T20 World Cup 2022) ट्रॉफीची प्रतिक्षा लांबली आहे. भारताने एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली २००७ मध्ये शेवटचा टी२० विश्वचषक जिंकला होता.

या मानहानिकारक पराभवानंतर एकीकडे भारतीय संघाच्या चाहत्यांमध्ये निराशेची लहर पसरली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी क्रिकेटपटूंसह चाहतेही मात्र भारताच्या पराभवाची मजा घेताना दिसत आहेत. अशातच अगदी पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान (Pakistan PM) शेहबाज शरीफ यांनीही भारतीय संघाची खिल्ली उडवली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी भारताच्या पराभवावर ट्विट करत रविवारी होणाऱ्या इंग्लंड-पाकिस्तान अंतिम सामन्याबद्दल सांगितले. पण इथे त्याने टी२० विश्वचषकातून बाहेर पडलेल्या भारतीय संघाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ज्यावर भारतीय चाहत्यांच्या संतापाचा भडका उडाला आणि त्यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

शेहबाज शरीफ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘१५२/० विरुद्ध १७०/० असा अंतिम सामना रविवारी होणार आहे.’

भारताचा गुरुवारी टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून १० गडी राखून पराभव झाला, या सामन्यात इंग्लंडची धावसंख्या १७०/० होती. गेल्या टी२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता, त्यावेळी पाकिस्तानची धावसंख्या १५२/० होती. असाच उल्लेख शेहबाज शरीफ यांनी टोमणा मारत केला आहे.