ऐतिहासिक लाल महालात लावणीचं शुटिंग; शिवप्रेमी संतापले 

Pune – पुण्यातल्या लाल महाल (Lal Mahal) ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. सध्या पुणे महापालिकेने उन्हाळ्याच्या सुट्टीत हा लाल महाल पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे. अशातच लाल महालात रिल्स काढण्याच्या निमित्ताने सिनेमातील गाण्यांवर आधारित रिल्सचं शुटिंग करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे (Mansi Patil, Kuldeep Bapat and Kedar Avsare) यांनी हे गाणं त्या ठिकाणी लाल महालात शूट केला आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. जिजाऊ-शिवरायांची अस्मिता म्हणजे तो लाल महाल आहे. हजारो शिवप्रेमी लाल महालात जाऊन नतमस्तक होत असतात. त्याच ठिकाणी लाल महाल बंद असताना चित्रपटाची घाणेरडी गाणी चित्रीत करून लाल महाल बदनाम केला जात आहे. असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

या जिजाऊ-शिवरायांनी सोन्याचा नांगर चालून हे पुणे वसवलं, त्याच जिजाऊंच्या लाल महालामध्ये अशा पद्धतीची गाणी चित्रित करणं हे निषेधार्ह आहे. हा लाल महालाचा अवमान आहे. या घाणेरड्या व्हिडिओ संदर्भात दोन-तीन दिवसापूर्वी मा.पोलिस आयुक्त, मा.मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे. मात्र पोलीस प्रशासन तक्रार दाखल करायला तयार नाही. मात्र आम्ही पाठपुरावा सोडणार नाही. या सर्व लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.