शिवसेना- राष्ट्रवादी फुटल्याने कॉंग्रेसला येणार अच्छे दिन; जाणून घ्या नेमकं काय आहे समीकरण 

माढा – राज्याच्या राजकारणामध्ये मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि पक्षाविरोधात बंडखोरी करुन राज्यातील शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या छुप्या भेटींमुळे उलट सुलट चर्चांना उधाण आहे आलं. काही दिवसांपूर्वीच अजित पवार पुण्यातील एका व्यवसायिकाच्या बंगल्यावर शरद पवारांना गुपचूप भेटल्याची चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये आहे.

पवार काका-पुतण्यांच्या या भेटीसत्रामुळे महाविकास आघाडीतही (Mahavikas Aghadi) बिघाडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र शरद पवार यांनी आपण भाजपाबरोबर जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे. तरीही महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि ठाकरे गटाने शरद पवार गटाशिवाय निवडणुका लढण्यासंदर्भातील चर्चा सुरु असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यानंतर राज्यातील बदलेल्या राजकीय परिस्थितीत अधिकाधिक जागा लढवण्याचा काँग्रेसचा (Congress) प्रयत्न आहे आणि त्यातूनच माढा लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी माढा लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या सातारा जिल्ह्यातील दहिवडी गावात झालेल्या मेळाव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना निवडणुकीला लागा, असा आदेश दिला आहे.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतर अनेक ठिकाणी या पक्षांकडे दुसऱ्या फळीतील नेतेच नसल्याचे दिसून येत आहे. याच ठिकाणी कॉंग्रेसमध्ये अजून म्हणावी तशी गळती झाली नसल्याने त्यांना आता पक्ष विस्तार करण्याची संधी दिसत आहे. जेव्हा जागावाटपाचा मुद्दा समोर येईल तेव्हा कॉंग्रेसचे पारडे जड असणार असून आता महाविकास आघाडीला जागावाटपाची समीकरणं नव्याने मांडावी लागणार आहेत, ज्यामध्ये काँग्रेसला संधी दिसत आहे.