सानिया-शोएबचा घटस्फोट खोटा, ‘या’ कारणासाठी चाहत्यांमध्ये पसरवल्या खोट्या बातम्या?

Sania Mirza Shoaib Malik: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटपटू शोएब मलिक यांचा घटस्फोट (Sania Mirza Shoaib Malik Divorce) झाला असल्याच्या चर्चा आहेत. शोएब पाकिस्तानी अभित्रेनी आयशा उमर हिच्या प्रेमात पडला असल्याने सानिया आणि त्याच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. हे दोघे गेल्या बऱ्याच दिवसांपासून एकमेकांपासून वेगळे राहात आहेत. या सर्व चर्चांदरम्यान सानिया आणि शोएब एका शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. या शोचा पोस्टर रिलीज झाला आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, सानिया आणि शोएब एक रिऍलिटी शो करणार आहेत. गेल्या आठवड्यातच या शोची घोषणा करण्यात आली आहे. या शोची अधिकृत घोषणा OTT प्लॅटफॉर्मने त्यांच्या सोशल मीडिया हँडलद्वारे केली आहे. शोचे फर्स्ट लूक पोस्टर देखील रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये सानिया आणि शोएब एकत्र दिसत आहेत आणि त्यांच्या मागे बुर्ज खलिफा दिसत आहे. ‘द मिर्झा मलिक शो’ (The Mirza Malik Show) असे या शोचे नाव आहे.

शोचे हे पोस्टर चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे, परंतु या जोडप्याने अद्याप हे पोस्टर त्यांच्या संबंधित सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेले नाही. सानिया आणि शोएबच्या या निर्णयामुळे चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे आणि सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. काही चाहत्यांचे म्हणणे आहे की सानिया-शोएबचा घटस्फोट हा शोसाठी एक पीआर स्टंट होता. तर काही लोकांचा असा विश्वास आहे की दोघांमध्ये खरोखर काही चांगले नाही, ज्यामुळे त्यांनी शोचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले नाही.