जितेंद्र आव्हाड… तुम्ही लोकांना येड्यात काढण्याचे काम बंद करा; वंचित बहुजन आघाडीची जहरी टीका 

पुणे – जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय चारित्र्य काय आहे हे अजित पवारांनी (Ajit Pawar) जगजाहीर केलं आहे. थोडीशीही झाकण्यापुरती जागा त्यांनी शिल्लक ठेवलेली नाही इतकं तुम्हाला उघडं पाडलं आहे. त्यामुळे आता नाकाने कांदे सोलने बंद करा. आणि स्वतःचं राजकीय चारित्र्य जे उघडं पडलंय ना ते स्वीकारा. लोकांना येड्यात काढण्याचे काम बंद करा अशी जहरी टीका वंचित बहुजन आघाडीचे  प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे (Sidharth Mokale) यांनी केली आहे.

ते म्हणाले,  तुमच्या राजकीय चरित्राचे वाभाडे अजित पवारांनी जग जाहीर काढलेले आहेत. एका सोबत संसार करत असताना दुसऱ्या सोबत जाण्याचे किती प्रयत्न 2014 पासून तुमचे सुरू होते हे सगळे अजित पवारांनी अगदी बैठकांच्या तपशिलासह सांगितलेले आहे.  त्यामुळे आधी त्याच्यावर लक्ष द्या. आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुमचं जे उघडं पडलं आहे ते कुठून तरी झाकता येतंय का त्याचा विचार आधी तुम्ही करा.

आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची सुद्धा वर्णी आता मंत्रीमंडळात लागणार आहे याची चर्चा आमच्या कानावर आलीय ती खरी आहे का ते आधी जाहीर करा. मनोहर भिडेला गुरुजी म्हणणाऱ्यांच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसणार आहात का ते एकदा स्पष्ट करा.अशी मागणी देखील मोकळे यांनी केली आहे.