सोमय्यांनी नगरविकास खात्यातील फाईली चेक केल्या, जितेंद्र आव्हाड म्हणाले…

मुंबई – महाविकासआघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांना काही सरकारी अधिकाऱ्यांनी थेट मंत्रालयात प्रवेश दिल्याच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात गेले होते. याठिकाणी ते अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल्स चाळतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोत नगरविकास खात्यातील अधिकारी किरीट सोमय्या यांच्यासमोर उभे असल्याचे दिसत आहे. यावरुन आता राजकारण रंगण्याची शक्यता आहे.  त्यावरून सत्ताधारी नेत्यांनी सोमय्यांवर कारवाईची मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी किरीट सोमय्या यांना मंत्रालयातील कार्यालयात मिळालेल्या या थेट प्रवेशावर आक्षेप घेतला आहे.

दरम्यान, आता यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, नगरविकास खात्याने हे तपासून पहावं. फाईल त्या विभागाच्या ताब्यात असतात. जो या सरकारचा घटक किंवा संविधानिक पद नाही अशी कोणी व्यक्ती फाईल उघडून पाहू शकतं असं मला वाटत नाही,” असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे. दरम्यान अधिकारी उभे होते यासंबंधी विचारण्यात आलं असता, एखादा माजी खासदार आलाच तर मराठी माणूस मोठ्या माणसासाठी खुर्ची रिकामी करतो, त्यात त्यांचा दोष नाही म्हणाले.

दरम्यान, या सर्व प्रकारावर सोमय्या यांनी भाष्य केले आहे. सोमय्या यांनी आघाडी सरकारला भीती कशाची वाटतेय? मी कोणत्या कोणत्या फायली तपासल्या याची भीती वाटतेय का? असा सवाल केला. माझ्यावर आधीच आघाडी सरकारमधील नेत्यांनी 13 गुन्हे दाखल केले आहेत. आता आणखी एक गुन्हा दाखल करतील, असं विधानही किरीट सोमय्या यांनी केलं आहे.