‘आघाडी सरकारमधील नेत्यांनी 13 गुन्हे दाखल केले आहेत, आता आणखी एक गुन्हा दाखल करतील’

मुंबई – महाविकासआघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांना काही सरकारी अधिकाऱ्यांनी थेट मंत्रालयात प्रवेश दिल्याच्या वृत्ताने मोठी खळबळ उडाली आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे काही दिवसांपूर्वी मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात गेले होते. याठिकाणी ते अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल्स चाळतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या फोटोत नगरविकास खात्यातील अधिकारी किरीट सोमय्या यांच्यासमोर उभे असल्याचे दिसत आहे. यावरुन आता राजकारण रंगण्याची शक्यता आहे.  त्यावरून सत्ताधारी नेत्यांनी सोमय्यांवर कारवाईची मागणी केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी किरीट सोमय्या यांना मंत्रालयातील कार्यालयात मिळालेल्या या थेट प्रवेशावर आक्षेप घेतला आहे.

किरीट सोमय्या कोणत्या अधिकाराखाली याठिकाणी गेले होते, असा सवाल सचिन सावंत यांनी विचारला. किरीट सोमय्या यांनी नगरविकास खात्याच्या कार्यालयात जाऊन फाईल्स तपासण्यासाठी माहिती अधिकारातंर्गत परवानगी घेतली होती का, हे तपासले पाहिजे. तशी परवानगी नसेल तर किरीट सोमय्या यांच्या हातून गु्न्हा घडला आहे. त्यासाठी किरीट सोमय्या यांच्यावर ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट कायद्याचे उल्लंघन आणि सरकारी कार्यालयात घुसखोरी या कलमांखाली गुन्हा दाखल होऊ शकतो. या प्रकरणाची चौकशी सुद्धा झाली पाहिजे असे सचिन सावंत यांनी म्हटले.

दरम्यान, या सर्व प्रकारावर सोमय्या यांनी भाष्य केले आहे. सोमय्या यांनी आघाडी सरकारला भीती कशाची वाटतेय? मी कोणत्या कोणत्या फायली तपासल्या याची भीती वाटतेय का? असा सवाल केला. माझ्यावर आधीच आघाडी सरकारमधील नेत्यांनी 13 गुन्हे दाखल केले आहेत. आता आणखी एक गुन्हा दाखल करतील, असं विधानही किरीट सोमय्या यांनी केलं आहे.