सोयाबीन बियाणे दरवाढ ही शेतकऱ्याला लुटणारी : आप

पुणे – यंदाच्या खरीप हंगामासाठी  महाबीजने घेतलेल्या सोयाबीन बियाणाच्या दरवाढ (Soyabean Seeds Price Hiking) निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. महाबीजने (Mahabeej Organisation) सोयाबीनच्या दरात ४० टक्के वाढ केली आहे तर या भाववाढीचा आधार घेत खाजगी कम्पन्यांनी ८० टक्के दरवाढ केली आहे!म्हणजेच ३० किलो सोयाबीन महाबीजच्या बियाणांसाठी शेतकऱ्यांना सुमारे १७०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

गतवर्षी महाबीजच्या सोयाबीनची गोणी २२५० रुपये होती, मात्र आता तीच बॅग घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३९०० रुपये मोजावे लागणार आहेत. ऐन खरीपाच्या पूर्वसंध्येला हा निर्णय घेण्यात आल्याने शेतकऱ्यांना हंगाम सुरू होण्यापूर्वीच दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. महाबीजच्या बियाण्यांना शेतकऱ्यांकडून मोठी मागणी आहे. मात्र, यंदा सोयाबीनच्या त्याच बियाणासाठी शेतकऱ्यांना जास्त किंमत मोजावी लागणार आहे.

महाबीज प्रशासनाने बियाण्याचे दर जाहीर केले आहेत. गतवर्षी काढणीच्या वेळी पावसामुळे अपेक्षित कच्चे बियाणे मिळाले नाही. त्यामुळे महाबीजला पुन्हा उन्हाळी हंगामात बीजोत्पादनाचा कार्यक्रम सुरू करावा लागला होता.हंगामात शेवटी सोयाबीनला ७००० रुपये क्विन्तल भाव मिळाला परंतु तोपर्यंत ९० टक्के शेतकर्यांचा माल विकून झाला होता. खरा फायदा स्टोकिस्ट व मोठ्या व्यापार्यांना झाला आहे.

आता महाबीजच्या बियाणाचा दर १३० ते १४५ रु किलो झाला आहे. महाबीजच्या बियाणांचा तुटवडा झाला की खाजगी कँपन्यांच्या किमतीला शेतकऱ्याला बियाणे खरेदी करावे लागेल. त्यामुळे ही दरवाढ खाजगी कंपन्यांच्या  फायद्यासाठीच  महाबीजने केली आहे असा आरोप आप ने केला आहे. या दरवाढीमुळे बाजारात बोगस बियाणे येवून शेतकर्याची फसवणूक होण्याची पण शक्यता आहे. मागील वर्षी प्रत्यक्ष शेतकर्याला मिळालेला भाव बघता हि दरवाढ तातडीने मागे घ्यावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे अध्यक्ष रंगा राचुरे (AAP Leader Ranga Rachure) यांनी केली आहे.