भाजपचा आमदार म्हणाला, मी अजितदादांचा फॅन आहे; भरणेमामांनी लगेचच पक्षात येण्याची ऑफर दिली

पुणे – भाजपचे आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे तोंड भरून कौतुक केले.  राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी दादांचा फॅन आहे, असं वक्तव्य भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी केले.

दादांचे काम, दादांचे कर्तृत्व आपल्याला माहीत आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी त्यांचा फॅन आहे. दादांची शिस्त मी पहिली आहे, असे अजित पवार यांचे कौतुक जयकुमार गोरेनी केले.

आमदार जयकुमार गोरे यांनी अजित पवार यांचं कौतुक केल्यानंतर लगेचच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी जयकुमार गोरेंना पक्षात येण्याची ऑफर दिली. बारामतीच्या नेत्यांनी एखाद्याला हात दिला तर दगडात देखील पाणी काढू शकतात. आमच्या दादांचे तुम्ही तोंड भरून कौतुक केलं आहे. भाऊ तुम्ही हाडाचा कार्यकर्ता आहात. चुकतो तोच माणूस असतो. आमच्या नेत्याचा उल्लेख चांगला केला आहे. तुमच्या डोक्यात चांगला विचार येउद्या आणि भविष्यात चांगला विचार करा असे म्हणत भरणेंनी जयकुमार गोरेंना पक्षात येण्याची ऑफर दिली.