गटबाजीमूळे राजकीय समुद्रात गटांगळ्या खाणार्‍या रिपब्लिकन चळवळीला वाचविणार कोण?

हेमंत रणपिसे – महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर रिपब्लिकन आणि बहुजन हे दोन परवलीचे शब्द झाले आहेत. राजकीय सामाजिक परिवर्तनवादी विचाराने जागा होत असलेला ओबीसी समाज स्वतःला बहुजन या नावाने संघटित करीत आहेे. आंबेडकरी समूह मात्र रिपब्लिकन या संकल्पनेवर जीवापाड प्रेम करीत असल्याचे चित्र आहे. त्याला कारण ही तसेच आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनतेला खुले पत्र लिहून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची संकल्पना मांडली.

प्रत्यक्ष संविधानकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची रिपब्लिकन ही संकल्पना असल्यामुळें गेली 66 वर्षे आंबेडकरी जनतेने रिपब्लिकन संकल्पनेला अतूट प्रेम करीत साथ दिली आहे. रिपब्लिकनला आपले मानले आहे. दिवंगत मान्यवर कांशीराम यांच्या प्रयत्नामुळे उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाला यश लाभले. त्या तुलनेत बहुजन समाज पक्षाला महाराष्ट्रात यश लाभले नाही. त्याचे एक कारण म्हणजे बसपा यूपीतून आलेला पक्ष आणि महाराष्ट्रात आंबेडकरी जनतेने रिपब्लिकनला आपला पक्ष मानला असल्यामुळे बहुजन संकल्पनेला येथे बळ मिळालेले नाही. रिपब्लिकन संकल्पने समोर बहुजन संकल्पनेचे आव्हान टिकलेले नाही. रिपब्लिकन चळवळीत कितीही गट असले तरी महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष म्हणून रिपब्लिकन गटांभोवती आणि निळ्या झेंड्याला आपला झेंडा मानून केंद्रित झाली. त्यामुळे महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाची एक निश्चित मतशक्ती निर्माण झाली. राज्यात रिपब्लिकन मतशक्ती ज्यांच्या बाजूने जाईल त्यांना सत्ता मिळते हा ज्वलंत इतिहास असल्याने महाराष्ट्रात रिपब्लिकन चळवळ हीच किंगमेकर ठरली आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन चळवळीचा वारसा एन शिवराज; कर्मवीर दादासाहेब गायकवाड; बी सी कांबळे; बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे; आर. डी. भंडारे; दादासाहेब रुपवते त्यानंतर रा. सु. गवई ; यानंतरच्या पिढीत केंद्रिय राज्यमंत्री ना. रामदास आठवले ; आमदार जोगेंद्र कवाडे आदी नेत्यांनी चालविला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीलाच भारतीय रिपब्लिकन पक्षाचे लघुउल्लेख करून भारिप केला आणि बहुजन महासंघ या नामाभिधानाला महत्व देत भारिप बहुजन महासंघ पक्ष चालविला. त्यानंतर अलीकडे तोही पक्ष विसर्जित करून वंचित बहुजन आघाडी हा नवीन पक्ष स्थापन केला आहे. यावर्षी झालेल्या लोकसभा आणि विधान सभा निवडणुकीत केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आणि अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर या दोन नेत्यांच्याच भोवती आंबेडकरी जनतेचे राजकारण फिरत होते. खरेतर मागील चार दशके प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले हे दोन प्रमुख नेतेच महाराष्ट्रातील रिपब्लिकन चळवळीवर आपल्या नेतृत्वाचे गारुड करून आहेत. यांच्या स्पर्धेत अन्य कोणताही नेता आंबेडकरी चळवळीत उभा राहू शकलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. रिपब्लिकन चळवळीत अनेक रिपब्लिकन गट आहेत. गटाचा जो प्रमुख नेता त्यांच्या नावाने तो रिपब्लिकनचा गट ओळखला जाऊ लागला. दिवंगत रा.सु. गवई यांच्याकडे नोंदणीकृत रिपाइं पक्ष होता. तरी गवई गट ही त्यांच्या पक्षाची समाजात ओळख होती. त्यानंतर भारतीय दलित पँथर बरखास्त केल्यानंतर 1990 पासून रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्ष हा आठवले गट म्हणून समाजाची मान्यताप्राप्त पक्ष राहिला. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांचा भारिप हा प्रकाश आंबेडकरांचा गट म्हणूनच समाजात ओळखला जाऊ लागला. त्यामुळे नेत्यांच्या नावाने रिपब्लिकनचे गट उभे राहिले हे सत्य नाकारता येत नाही.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष हा माझाच रिपब्लिकन पक्ष असल्याचा प्रत्येक गट दावा करू लागला. काळाच्या प्रवाहात हे रिपब्लिकन गट क्षीण होत राहिले. उरले ते फक्त रामदास आठवले ; प्रकाश आंबेडकर यांचे गट. त्यात प्रकाश आंबेडकर यांनी या वर्षी लोकसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर त्यांचा भारतीय रिपब्लिकन पक्ष विसर्जित केल्याचे जाहीर केले. त्यामुळे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचा वारसा केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडेच आला आहे. रामदास आठवले यांनी सुरुवातीपासूनच मूळ रिपब्लिकन संकल्पनेनुसार अखंड निळा झेंडा हाती घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी अहोरात्र कष्ट केले आहे. ऊन वारा पाऊस वादळाचा विचार न करता; साधन समुग्रीचा अभाव असताना सुद्धा रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा संपूर्ण देशात पोहोचविला. त्यांनी सन 2016 मध्ये कन्याकुमारी ते भीमजन्मभूमी महु (मध्यप्रदेश) पर्यंत संपूर्ण भारतात जाती तोडो समाज जोडो समता अभियान अंतर्गत भारतभीम यात्रा काढली. त्या भारतभीम यात्रेत मी स्वत:हा लोकनेते रामदास आठवलेंसोबत संपूर्ण भारत फिरलो. त्यावेळी मी स्वत: अनुभवले आहे की, केरळ, तामिळनाडू, पाँडेचेरी, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या संपूर्ण दक्षिण भारताबरोबरच पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगढ, झारझंड बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली, काश्मिर, चंदीगढ, पंजाब, राजस्थान यासंपूर्ण उत्तरभारतात एव्हढेच नव्हे तर कधीही यापूर्वी ईशान्य भारतात न पोहोचलेला रिपब्लिकन पक्ष रामदास आठवले यांच्या नेतृत्वात पहिल्यांदाच ईशान्य भारतातील आसाम, मणिपूर, नागालँड, अरुणाचलप्रदेश, मिझोराम, हिमाचलप्रदेश या राज्यात रिपब्लिकन पक्षाचे संघटन उभे राहिले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष आणि निळा ध्वज संपूर्ण भारतात पोहोचविण्याचे भरीव योगदान रामदास आठवले यांनी आंबेडकरी चळवळीसाठी दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी पायाला भिंगरी बांधून अहोरात्र देशभर कष्ट करणार्‍या रामदास आठवलेंना त्यांच्या कष्टाचे फळ मिळालेले आहे. रामदास आठवले हे महाराष्ट्रात समाजकल्याण खात्यासह परिवहन दारुबंदी आदी खात्यांचे कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत. त्यानंतर तीन वेळा लोकसभेत खासदार म्हणून निवडले गेले आहेत. त्यानंतर राज्यसभेत खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांचा निष्ठावंत भीमसैनिक म्हणून केंद्रीय मंत्रीमंडळात दोनदा केंद्रीय राज्यमंत्री होण्याचा बहुमान त्यांना लाभला आहे. जो नेता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निळ्या झेंडाशी एकनिष्ठ राहून त्यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्षाचे प्रामाणिकपणे काम करतो त्या नेत्याला रिपब्लिकन चळवळ सत्तेच्या स्वरुपात बक्षिस देते. त्यांचे मूर्तीमंत उदाहरण रामदास आठवले आहेत. रामदास आठवले यांनी बाबासाहेबांनी जो रिपब्लिकन पक्ष दिला आहे त्या संकल्पनेनुसार रिपब्लिकन पक्ष चालविला आहे.

रिपब्लिकन पक्ष चालविताना त्यांनी कार्यकर्त्यांवर प्रचंड प्रेम केले. कार्यकर्त्यांनीही रामदास आठवलेंवर जिवापाड प्रेम केले आहे. संपूर्ण देशातील कार्यकर्त्यांची नावे त्यांना तोंडपाठ असतात. त्यांच्या कार्यकर्त्यांवर प्रचंड विश्वास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी निष्ठावंत विश्वासू, कार्यकर्त्यांची प्रचंड फौज रामदास आठवलेंसोबत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार होण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य होणे ही काळाची गरज आहे. रिपब्लिकन ऐक्यामुळेच आंबेडकरी समाज शासनकर्ती जमात होऊ शकतो. रिपब्लिकन ऐक्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या 6 टक्के असणार्‍या बौद्धांची एकजुट होऊ शकते. त्याएकजुटीला बहुजन समाजाची आणि अल्पसंख्यांकांचीही साथ लाभू शकते. त्यातून एकीकृत रिपब्लिकन पक्ष सत्ताधारी पक्ष होऊ शकतो. पण हे ध्येय साध्य करण्यासाठी रिपब्लिकन ऐक्य होणे आवश्यक आहे.

रिपब्लिकन ऐक्यासाठी कोणत्याही पदाचा त्याग करण्याची तयारी रामदास आठवले यांनी अनेकदा दाखविली आहे. मात्र इतर प्रमुख नेत्यांकडून विशेषत: प्रकाश आंबेडकरांकडून रिपब्लिकन ऐक्याला स्पष्ट नकार देण्यात आलेला आहे. आता तर प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकनचा वारसा नाकारला आहे असे असतानाच रिपब्लिकन ऐक्याऐवजी रोज नवे रिपब्लिकन गट जन्माला येत आहेत. एकमेकांसोबत रिपब्लिकन पक्षात काम करणारे कार्यकर्ते एकमेकांशी पटले नाही की, नवीन रिपब्लिकन गट सुरु करतात. रिपाइं खोब्रागडे गटातून राजाराम खरात वेगळे झाले. त्यांचा रिपाइं (आरके) हा नवीन गट निर्माण झाला. रामदास आठवलेंच्या नेतृत्वात काम करणार्‍या सचिन खरात या युवकानेही रिपाइं तून बाहेर पडून रिपाइं (खरात) गट हा नवीन रिपब्लिकन गट सुरु केला. साहित्यिक अर्जुन डांगळे हे प्रकाश आंबेडकरांचा गट सोडून रामदास आठवलेंच्या रिपाइंत आले. त्यानंतर 2014 मध्ये आठवलेंचा रिपाइं सोडून अर्जुन डांगळे यांनी रिपब्लिकन जनशक्ती नावाचा नवा रिपब्लिकन गट सूरु केला. पूर्वी दिवंगत टी.एम कांबळे हे रामदास आठवलेसोबत काम करीत होते. त्यांचाही नंतर रिपाइं डेमोक्रटीक गट सुरु झाला. अनेक नेते, कार्यकर्ते एकत्र काम करताना काही कारणास्तव वेगळे होतात आणि वेगळा गट सुरु करतात. याची अनेक उदाहरणे आहेत. रामदास आठवलेंसोबत त्यांचे गेली 40 वर्ष सहकारी असणारे मध्यप्रदेशचे मोहनलाल पाटील हे त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर ) हा पक्ष स्वतंत्र चालवित आहेत. रिपाइं (आंबेडकर) या पक्षाचा राजीनामा देवून रामदास आठवलेंनी रिपाइं (आठवले)या नवीन पक्षाची नोंदणी केली. त्यामुळे मोहनलाल पाटील यांच्या रिपाइं (आंबेडकर) या पक्षाचे अध्यक्षपद रिक्त झाले. त्या रिपाइं (आंबेडकर) पक्षाच्या रिक्त राष्ट्रीय अध्यक्षपदी दीपक निकाळजे यांची निवड करुन महाराष्ट्रात नवीन रिपाइं गट निर्माण करण्याचे काम मोहनलाल पाटील यांनी केले. रिपाइंचे अनेक गट महाराष्ट्रात असताना पुन्हा एका नव्या गटाची भर मोहनलाल पाटील आणि दिपक निकाळजे यांच्या रिपाइं (आंबेडकर) मुळे भर पडली आहे.

मोहनलाल पाटील हे रामदास आठवलेंच्या नेतृत्वात भारतीय दलित पँथरपासून मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये आंबेडकरी चळवळीचे काम करणारे कार्यकर्ते आहेत. 1998 मध्ये रिपब्लिकन ऐक्य झाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार लोकसभेत उगवता सूर्य या निशाणीवर निवडून गेले. त्यात मुंबईतील दादर, धारावी, दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघातून रामदास आठवले उगवता सूर्य या रिपाइंच्या निशाणीवर लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर 1999 मध्ये काँग्रेसमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी फुट पडल्यानंतर रामदास आठवले हे पंढरपूर लोकसभा मतदार संघातून खटारा निशाणीवर अपक्ष खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेले. तेव्हा रिपब्लिकन ऐक्य फुटल्यामुळे नवीन रिपब्लिकन पक्ष आरपीआय ए नोंदणीसाठी निवडणूक आयुक्तांकडे रामदास आठवलेंनी संपर्क साधला असता त्यांना अपक्ष खासदार निवडून आल्यामुळे राजकीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविता येणार नसल्याचे कारण सांगण्यात आले. त्यामुळे पँथर चळवळीपासून विश्वासू सहकारी असणारे मोहनलाल पाटील यांनी आरपीआय ए या पक्षाची नोंदणी केली. त्यानंतर सन 2004 च्या लोकसभा निवडणुकीत आरपीआय ए या मोहनला पाटील यांनी नोंदणीकृत केलेल्या पक्षाच्या एबी फॉर्मवर रामदास आठवले पंढरपूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले. त्या दरम्यानच्या काळात उगवता सुर्य निशाणी असलेला मूळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाची नोंदणी दिवंगत नेते रा.सु. गवई यांच्याकडे होती. तोच मुळ रिपाइं गवईंसोबत एकत्र येवून चालविण्याचा रामदास आठवलेंचा निर्धार होता. त्यामुळे रामदास आठवलेंनी नवीन रिपब्लिकन पक्ष नोंदणी करण्याचा विचार केला नाही. त्या दरम्यान मोहनलाल पाटील या आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांने रिपाइं ए या पक्षाची नोंदणी सन 2004 मध्ये केलेली होती. त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी रामदास आठवलेंची निवड झालेला चेंज रिपोर्ट निवडणूक आयुक्तांना कळविण्याचा निर्णय मोहनलाल पाटील यांनी आणि रामदास आठवले व महाराष्ट्रातील रामदास आठवलेंच्या समर्थक नेत्यांनी घेतला. त्यामुळेच रिपाइं ए चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून रामदास आठवलेंचा लिखित स्वरुपात सर्वत्र उल्लेख होऊ लागला.

रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपाइं ए संपूर्ण देशात वाढू लागला. रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपाइं हा महाराष्ट्रात आणि देशात रिपाइं च्या आठवले गट म्हणूनच ओळखला जावू लागला. प्रत्यक्ष रिपाइं ए ची निवडणूक आयोगाकडे नोंदणी रिपाइं (आंबेडकर) या नावाने होती तसेच या रिपाइं आंबेडकर या पक्षाचे सर्व अधिकार मोहनलाल पाटील यांच्याकडे होते. तसेच या पक्षाचे मुख्य कार्यालय भोपाळ येथे होते. मोहनलाल पाटील आणि रिपाइं आठवले समर्थकांकडून मोहनलाल पाटील यांच्याशी अनेकदा याबाबत चर्चा झाली. रिपाइं चे प्रमुख कार्यालय भोपाळमध्ये न ठेवता ते मुंबईमध्ये स्थलांतरीत करावे व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून रामदास आठवलेंचे नावे चेंज रिपोर्ट निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात यावा. मात्र रिपाइं ए चे मुख्य कार्यालय भोपाळ येथून मुंबईकडे स्थलांतरीत करण्यास मोहनलाल पाटील तयार झाले नाहीत. तसेच त्या पक्षाचे सर्व अधिकार मोहनलाल पाटील यांच्याकडे असल्याने महाराष्ट्रातील रामदास आठवलेंच्या समर्थकांनी मागणी केल्यामुळे रिपाइं आठवले नावाने रिपब्लिकन पक्षाची नोंदणी रामदास आठवलेंनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांंच्या संकल्पनेवर आधारित रिपब्लिकन पक्ष रामदास आठवले चालवित असल्यामुळे मोहनलाल पाटील यांनी त्यांचा पक्ष तसाच ठेवून आठवलेंच्या नेतृत्वातील रिपाइं आठवले मध्ये काम करायला पाहिजे होते. मात्र आता रिपाइं आंबेडकर या नावाने मोहनलाल पाटील यांचा रिपब्लिकन गट आणि रिपाइं आठवले नावाने रामदास आठवलेंचा रिपब्लिकन गट असे दोन भाग झालेले आहेत. रामदास आठवले बाबासाहेबांच्या संकल्पनेतला रिपब्लिकन पक्ष घेवून पुढे चालले आहेत. तांत्रिक अडचणीवर मात करण्यासाठी त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या नावाने नोंदणी केली आहे. असे असले तरी पूर्वीपासूनच रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष हा रिपाइं आठवले गट म्हणूनच ओळखला जातो.

रामदास आठवले आणि रिपब्लिकन पक्ष हे समीकरण झालेले आहे. संपूर्ण देशात रिपब्लिकन चळवळीचा चेहरा रामदास आठवले झाले आहेत. रिपब्लिकन गटांच्या शर्यतीत रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकर यांच्याशी वर्षोनुवर्षे स्पर्धा सुरु आहे. प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रक्ताचा नातु प्रकाश आंबेडकर यांचे रामदास आठवलेंसमोर आव्हान असताना रामदास आठवले आणि त्यांचे समर्थक कधीही डगमगले नाहीत.उलट केंद्रीय मंत्रिमंडळात सन्मानाचे स्थान पटकावून रामदास आठवले हे रिपब्लिकन गटातटाच्या शर्यतीच्या फार पुढे गेलेले राष्ट्रीय नेते ठरले आहेत. त्यांच्या हाती निळ्या झेंड्याची शान आणि रिपब्लिकन पक्षाचा बहुमान सुरक्षित राहणार आहे. रिपब्लिकन पक्षाचा आणि निळ्या झेंड्याचा सन्मान देशभर वाढविण्यासाठी संघर्ष नायक नेते रामदास आठवलेंशिवाय अन्य कोणता समर्थ पर्याय रिपब्लिकन चळवळीसमोर दिसत नाही. प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन संकल्पना आणि रिपब्लिकन ऐक्याला नकार दिल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकनचा वारसा रिपब्लिकन ऐक्याचे पुरस्कर्ते रामदास आठवले हेच समर्थपणे चालवतील यात शंका नाही. त्यासाठी रिपब्लिकन तरुणांनी रोज नवे निर्माण होणारे रिपब्लिकन गट चालविण्यापेक्षा रिपब्लिकन ऐक्याला बळ द्यावे. रिपब्लिकन चळवळीला गटबाजीपासून वाचविण्यासाठी रिपब्लिकन ऐक्याचे पुरस्कर्ते व्हा. रोज नवे गट काढून रिपब्लिकन चळवळीचे मारेकरी होऊ नका तर रिपब्लिकन ऐक्याचेे पहारेकरी व्हा.

महत्वाच्या बातम्या-

‘मुस्लिम मुलाशी लग्न केल्यास हिंदू मुली त्यांचे हक्क गमावतील’, भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

Cyclone Michaung चा हाहाकार, चेन्नईत पाच जणांचा मृत्यू; एअरफील्ड बंद

अफेअरच्या चर्चांदरम्यान जान्हवी कपूरचं बड्या नेत्याच्या नातवाबरोबर महाकाल दर्शन – Video