श्रीलंकन क्रिकेटर मुरलीधरन भारतात सुरू करतोय नवा व्यवसाय, स्थानिकांना मिळणार रोजगार

श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) यांना भारतात कोण ओळखत नाही. खरं तर आज या नावाची चर्चा होत आहे कारण मुरलीधरन आता भारतात आपला व्यवसाय (Muttiah Muralitharan Business) वाढवू लागला आहे आणि सुमारे 500 भारतीयांना या व्यवसायातून रोजगारही मिळणार आहे.

क्रिकेटपटूनंतर मुथय्या मुरलीधर हा देखील एक यशस्वी उद्योगपती आहे, जो श्रीलंकेतही स्वतःचा व्यवसाय चालवतो. मुरलीधरन आता भारतातील कर्नाटक राज्यातील धारवाडमध्ये कारखाना बांधणार आहे, त्यासाठी त्यांनी जमीनही पाहिली आहे. मुम्मट्टी येथील औद्योगिक वसाहतीत एनर्जी ड्रिंकसाठी आवश्यक अल्युमिनियमचे कॅन बनविण्याचा कारखाना स्थापन केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी मुरलीधरन यांच्या कंपनीने सरकारकडे 26 एकर जागेची मागणी केली असून या प्रकल्पात 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे.

क्रिकेट निवृत्तीनंतर मुरलीधरन अनेक वर्षांपासून शीतपेय कंपनीशी संबंधित व्यवसाय करत आहेत. आता मुरलीधरन सिलोन बेव्हरेज कॅन प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या एका श्रीलंकन ​​कंपनीसोबत फॅक्टरी बांधणीचे काम सुरू करणार आहेत. असे सांगण्यात येत आहे की जर सर्व काही ठीक झाले तर पुढील 2 ते 3 महिन्यांत प्रकल्प सुरू होईल.