‘पवार साहेबांमुळं मंत्रिमंडळाचं बाशिंग बांधून बसलेल्या नेत्यांवर टाळ्या वाजवण्याची वेळ आली’

दहिवडी : २०१९ विधानसभा निवडणुकी नंतर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करत शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्तेत आले आणि सर्वात मोठा पक्ष असून देखील भाजपला सत्तेतच्या बाहेर बसावं लागलं. यामुळे निवडणुकीपूर्वी इतर पक्षातून भाजपात आलेल्या नेत्यांच्या मंत्रिपदाच्या स्वप्नाला मोठे सुरुंग लागले. असेच एक नेते म्हणजे भाजपचे आमदार जयकुमार गोरे. आता जयकुमार गोरे यांच्या मंत्रिपदाच्या महत्वकांक्षेवर राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी जोरदार वार केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे काय करतील याचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. शरद पवार यांच्यामुळे मंत्रिमंडळाचं बाशिंग बांधून बसलेल्या नेत्यांवर टाळ्या वाजवण्याची वेळ आली, असा टोला प्रभाकर देशमुख यांनी जयकुमार गोरे यांना लगावला आहे.

बिजवडी विकास सेवा सोसायटीतील महाविकास आघाडीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला. या वेळी प्रभाकर देशमुख यांनी आमदार गोरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, शरद पवार यांनी माढ्याच्या खासदारकीच्या काळात माण-खटाव साठी 175 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन दिला होता. त्यामुळे शरद पवारांवर आरोप करून फसवणूक करणाऱ्यांना खड्यासारखं बाजूला करायला हवे. माण तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत.