‘निरपराध माणसाच्या पाठीशी भाजप नेहमीच उभी रहाते, मग तो पक्षाचा असो की नसो’

मुंबई : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. आता नितेश राणे यांना ४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नितेश राणेंना संतोष परब हल्लाप्रकरणी न्यायालयानं याआधीची जामीन अर्ज देणं फेटाळलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिवाणी न्यायालयात नितेश राणे शरण गेले होते. त्यानंतर याप्रकरणी युक्तिवाद झाला. कणकवली पोलिस स्टेशनमध्ये आता आमदार निलेश राणे यांना नेलं जाणार आहे. आता पोलिस कोठडीत त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे.

नितेश राणेंच्या अटकेवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया देत राणेंच्या पाठीशी भाजप ठामपणे उभी असल्याचे सांगितले आहे. ‘राणेंच्या बाबतीत सरकारनं सूडबुद्धीनं वागू नये. एखादा व्यक्ती जर दोष सिद्ध करण्याइतका गंभीर दिसत असेल, तर त्याच्यावर कारवाई करावी. छगन भुजबळांनंतर जे सुडाच्या भावनेनं कारवाईचं सत्र सुरु झालं, तसं होऊ नये. दोन्ही बाजूने युक्तीवाद होईल, पोलिस चौकशी होईल ‘वेट एन्ड वॉच…’ निरपराध माणसाच्या पाठीशी भाजप नेहमीच उभी रहाते, मग तो पक्षाचा असो की नसो. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे’, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिलीय.

काय आहे प्रकरण ?

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भावर्यात आडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.