काँग्रेसमध्ये भूकंप : आपल्याच मंत्र्यांवर नाराज असलेले आमदार मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून काँग्रेस आपल्याला सन्मानाची वागणूक मिळत नाही म्हणून आघाडीत नाराज असल्याच्या बातम्या अधून-मधून येतच असतात. मात्र आता थेट काँग्रेसचे आमदार आपल्याच मंत्र्यावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील जवळपास सात ते आठ आमदार आपल्या मंत्रीवर नाराज असल्याची बातमी आहे.

हे नाराज आमदार मंत्र्यांची तक्रार थेट दिल्ली हायकमांडकडे करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी हे आमदार दिल्लीला जाणार आहेत. यावेळी ते काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेनुगोपाल यांची भेट घेणार आहेत. या नाराज आमदारांनी काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्या भेटीचीही वेळ मागितली आहे. काँग्रेसच्या खराब कामगिरी असणाऱ्या मंत्र्यांची तक्रार हे आमदार हायकमांडकडे करणार आहेत.

पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातले नाराज काँग्रेस आमदार दिल्लीत जाण्याच्या तयारीत आहेत. 10 दिवसांपूर्वी विदर्भातल्या नाराज काँग्रेस आमदाराने दिल्लीत काँग्रेस मंत्र्यांची तक्रार केली होती. आता राज्यातील सात- आठ आमदार सामूहिक तक्रार करणार असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.