साम, दाम, दंड भेद सर्व काही ओक्के करून हे सरकार ओरबाडून आणलं गेलंय – सुप्रिया सुळे

पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या गणेशोत्वानिमित्त वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या घरी गणपती दर्शनाला जाताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत माध्यमांचे कॅमेरे असतात. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्यावर हल्ला चढवला आहे.

साम, दाम, दंड भेद सर्व काही ओक्के करून हे सरकार ओरबाडून आणलं गेलंय. त्यांचा उत्साह फक्त लाल दिव्यांचाच होतात. अडीच महिन्यात काही काम होताना दिसत नाहीत. ज्या उत्साहाने आमचं सरकार (government) पाडलं त्या उत्साहाने कामे होत नाहीत. होम व्हिजिट सोडून या सरकारच्या फारश्या काही बातम्या दिसत नाहीत. जे दौरे दिसतात ते एक किलोमीटरच्या आतले असतात. मी जेव्हा जेव्हा टीव्ही बघते तेव्हा मला ते कुणाच्या तरी घरीच दिसतात, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मी मंत्र्यांची वेळ मागत आहे. पण वेळ मिळत नाही. त्यांना सर्वसामान्य लोकांची सेवा करायची नसेल. मंत्री फक्त कुणाच्या तरी घरी दिसत आहेत. फक्त गाठीभेटी होत आहेत. एक किलोमीटरच्या आतचा दौरा करत आहेत. हे नवलच आहे. राज्याला मागच्या अडीच महिन्यापासून पालकमंत्री नाही. त्यामुळे लोकांना कुठे तक्रार करावी हेच कळत नाही, असं त्या म्हणाल्या.