भाजप आमदाराच्या गाडीनं दोन भावांना चिरडलं; अपघातात दोघांचा मृत्यू

लखनौ – उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) पुन्हा एकदा चर्चेत आहे. येथे भाजप आमदाराच्या वेगवान स्कॉर्पिओने (Scorpio) 2 जणांना चिरडले. या अपघातात दुचाकीवरील दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वाहन व चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सदर कोतवालीच्या रामापूरजवळ (Ramapur) हा अपघात झाला. ही कार भाजप आमदार योगेश वर्मा (BJP MLA Yogesh Verma) यांची असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मृत हे खेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील किरतपूर गावातील रहिवासी आहेत. रामापूरहून घरी परतत असताना हा अपघात झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून स्कॉर्पिओ कार आणि चालकाला ताब्यात घेतले.

योगेश वर्मा (Yogesh Verma)  यांची पत्नी नीलम वर्मा (Neelam varma) यांच्या नावावर वाहन नोंदणीकृत असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदरचे आमदार ही घटना घडली तेव्हा गाडीत उपस्थित नव्हते. त्याचवेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक अरुण सिंह (Additional Superintendent of Police Arun Singh)  यांनी सांगितले की, लखीमपूर-बहराइच रस्त्यावर (Lakhimpur-Bahraich road) रामापूरजवळ दुचाकी आणि स्कॉर्पिओ यांच्यात झालेल्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी पकडलेली स्कॉर्पिओ गाडी आमदार योगेश वर्मा यांची आहे. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.