3 मे पर्यंत सर्वच प्रार्थनास्थळावरील भोंगे काढा, अन्यथा कारवाई – नाशिक पोलीस आयुक्त

नाशिक – गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी भोंग्यांच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले. सोबतच राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिलाय.

राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे,” असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.  न्यायालयाच्या निकालाचे पालन सर्वांनी करायलाच हवे असं त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात मशिदीवरील भोंग्याचा वाद सुरू असताना नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी (Nashik Police Commissioner) महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. नाशिकमधील 3 मे पर्यंत मशीदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे (Nashik Police Commissioner Deepak Pandey) यांच्या या आदेशाची आता चर्चा सुरू झाली आहे. नाशिकमध्ये जातीय तेढ (Ethnic rift)  निर्माण न करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलेल्या आदेशानुसार, मशिदीच्या 100 मीटर परिसरात हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणण्यास परवानगी नाही. त्याशिवाय, कोणाला हनुमान चालीसा लावायची असल्यास देखील पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक असणार आहे.

जर ३ मे नंतर प्रार्थनास्थळावर विनापरवानगी भोंगे असतील तर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयाने काढलेल्या आदेशानुसार, ध्वनीक्षेपकाविषयी सर्वोच्च न्यायलयाच्या (Supreme Court) आदेशाचे पालन करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश आणि त्याअनुषंगाने राज्य सरकारचे (State Government) आदेश यानुसार, आवाजाची पातळी ठरवण्यात आली आहे. या आवाजाची पातळी औद्योगिक, निवासी, व्यावसायिक, शांतता क्षेत्रासाठी निश्चित करण्यात आली आहे. यानुसार भोंगे असलेल्या प्रार्थनास्थळांना आवाजाची पातळी ठरवावी लागणार आहे.