एक तीर दो निशाणे! बांगलादेशला १८८ धावांनी हरवत भारताने सोपा केला WTC फायनलचा मार्ग

चट्टोग्राम| भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (१८ डिसेंबर) पहिल्या कसोटीत बांगलादेश संघाला १८८ धावांच्या फरकाने पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयासह भारतीय संघाने एक तीर दोन निशाण मारले आहेत. भारताने बांगलादेश संघाला पराभूत करत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत श्रीलंकेला मागे सोडले आहे. याबरोबरच गुणतालिकेतही टॉप-३ संघांमध्ये भरारी घेतली आहे.

कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याच्या दृष्टीने बांगलादेशमध्ये सुरू असलेली कसोटी मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि हे महत्त्व भारताला चांगलेच कळले आहे. चट्टोग्राम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत भारताने बांगलादेशचा १८८ धावांनी पराभव केला. या मोठ्या विजयासह त्यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या गुणतालिकेत १२ गुण मिळवले आहेत. यासोबतच एका स्थानाची झेपही घेतली आहे.

चट्टोग्राम कसोटीत बांगलादेशचा पराभव केल्यानंतर भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या नवीन गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे. यापूर्वी ते चौथ्या क्रमांकावर होते, मात्र बांगलादेशला पराभूत केल्यानंतर आता संघ तिसऱ्या स्थानावर आला आहे. म्हणजेच आता फक्त ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका त्यांच्या पुढे आहेत. गुणतालिकेत भारताने ५५.३३ टक्के गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. ज्यामध्ये श्रीलंकेचा संघ ५३.३३ टक्के गुणांसह मागे पडला आहे. ऑस्ट्रेलिया ७५ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेचे गुण ६० टक्के आहेत.