एकनाथ शिंदे सरकारला अजिबात धोका नाही; अजित पवारांचे लक्ष्यवेधी वक्तव्य

Maharashtra Political crises –   महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील चर्चा आणि सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असून त्याची उत्सुकता महाराष्ट्राबरोबरच अवघ्या देशाच्या राजकीय वर्तुळाला लागलेली आहे. यासंदर्भात न्यायालय नेमका काय निर्णय देणार? याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

दरम्यान, या निकालाच्या आधी राज्यातील राजकीय वातावरण तापले असून अनेक दावे- प्रतिदावे केले जात आहेत. विरोधक हे सरकार पडणार असा दावा करत असताना विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली आहे. एकनाथ शिंदे सरकारला धोका नसल्याचं विधान अजित पवारांनी केलं आहे.

आत्याबाईला मिशा असत्या तर काय म्हटलं असतं अशा चर्चांना काय अर्थ आहे? आजच्या घडीला त्यांच्याकडे १४५पेक्षा जास्त बहुमत आहे. त्यामुळे ते सरकार चालवतायत. खूप जणांनी अशी वक्तव्यं केली आहेत की घटनाबाह्य सरकार वगैरे. जरी म्हणायला तसं असलं, तरी त्यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. सरकार ते चालवत आहेत. निर्णय ते घेत आहेत. बहुमताने लोकशाहीत जो अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळाला असतो त्या अधिकारांचा ते पुरेपूर वापर करत आहेत. १४५ आमदारांचं पाठबळ जोपर्यंत त्यांच्याकडे आहे, तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणण्यात अर्थ नाही”, असं अजित पवार म्हणाले.