‘सोमय्या यांनी राणे यांच्याविरोधात ईडीकडे केलेल्या तक्रारीचे काय झाले? त्यांना क्लीनचीट मिळाली का?’

मुंबई – केंद्रसरकार केंद्रीय एजन्सीचा(Central Agencies) वापर राजकीय विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी करत आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase)यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान केंद्रसरकारने ईडी कार्यालयामार्फत ४७०० केसेस दाखल करण्यात आल्या त्यामध्ये ३१३ लोकांना अटक करण्यात आली आणि आतापर्यंत १७०० धाडी टाकल्या मात्र ईडीने टाकलेल्या या केसेसमध्ये फक्त ९ केसमध्ये आरोपींवर आरोप सिद्ध झाले आहे असे जाहीर केले आहे. अशी आकडेवारीच आज पत्रकार परिषदेत महेश तपासे यांनी ठेवली.

एनसीबीने केलेल्या चुकीच्या कारवाईवर राष्ट्रवादीने आवाज उठवला आहे. केंद्रीय एजन्सीमधील राजकीय हस्तक्षेप बंद झाला तरच गुन्हेगाराला शिक्षा होऊ शकते. मात्र आजकाल सहज आरोप भाजप करत आहेत आकडे देत आहेत. संपत्ती बाहेर पडणार अशा आगाऊ सूचना त्यांना कशा मिळतात असा सवालही महेश तपासे यांनी केला.

देशाच्या पैशासोबत कोण गैरव्यवहार करत असेल तर त्याच्यावर कारवाई करा. मात्र विरोधक बोलतात म्हणून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करायचा हे योग्य नाही असेही महेश तपासे म्हणाले.

किरीट सोमय्या यानी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गैरमार्गाने पैसा जमा केला अशी तक्रार करुन कारवाईबाबत ईडीकडे केली होती. त्या तक्रारीचे काय झाले. नारायण राणे यांना क्लीनचीट मिळाली का? या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत अशी मागणीही महेश तपासे यांनी केली.

आतापर्यंत दहावेळा पेट्रोल – डिझेलचे दर वाढले आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या मोदीसरकारने गेल्या काही दिवसांपासून जी दरवाढ केली आहे त्याने सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. डिझेलचे दर वाढल्याने सामान्यांची एसटी व मुंबई बेस्टलाही फटका बसला आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य लोकांना भोगावा लागत आहे असेही महेश तपासे म्हणाले.

हिंदूच्या देवस्थानांच्या ठिकाणी हिंदू वगळता इतरांनी स्टॉल लावू नये असा फतवा कर्नाटक राज्यात काढण्यात आला आहे. ही गंभीर बाब आहे. संविधानाने लोकांना जे अधिकार दिले आहेत ते अधिकार हिरावून घेण्याचा कुणालाही अधिकार नाही असेही महेश तपासे यांनी ठणकावून सांगितले.

एखाद्याने आरोप केल्यानंतर तो आरोप सिद्ध करावा लागतो त्यासाठीची कागदपत्रे कोर्टात कालमर्यादेत ठेवली पाहिजेत. चौकशीच्या नावाखाली यंत्रणा वेळकाढूपणा करते हे योग्य नाही. एनसीबीची पोलखोल राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली होती. त्यामध्ये केंद्रसरकारची मोठी नाचक्की झाली होती त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी ईडीच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे असा आरोपही महेश तपासे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केला.

या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो, विद्याताई चव्हाण, आशाताई मिरगे, महेश चव्हाण आदी उपस्थित होते.