१६ आमदार अपात्र ठरणार, शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार, सरकार कोसळणार – नरहरी झिरवळ  

Maharashtra Political crises –  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील चर्चा आणि सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असून त्याची उत्सुकता महाराष्ट्राबरोबरच अवघ्या देशाच्या राजकीय वर्तुळाला लागलेली आहे. यासंदर्भात न्यायालय नेमका काय निर्णय देणार? याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

दरम्यान, या निकालाच्या आधी राज्यातील राजकीय वातावरण तापले असून अनेक दावे- प्रतिदावे केले जात आहेत. यातच आता विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी १० महिन्यांपूर्वी शिंदे गटाच्या १६ आमदारांना पक्षविरोधी कारवायांच्यामुळे अपात्र ठरवण्यासंदर्भात नोटिसा पाठवल्या होत्या. मात्र, त्यानंतर राजकीय घडामोडी घडल्या आणि शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. आता झिरवळ यांनी आपण घेतलेला निर्णय कायद्याला धरूनच होता, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
“हा निर्णय घटनेला धरूनच मी केला आहे. आजचा निर्णयही अपात्रतेचा येईल. जर १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ते अपात्र झाल्यानंतर आपोआप मुख्यमंत्रीपद जाईल. त्यानंतर सरकार कोसळेल”, असं नरहरी झिरवळ म्हणाले.