उत्तर प्रदेशच्या निवडणूकित आरपीआय ब्राह्मण समाजाला सोबत घेणार – रामदास आठवले

लखनौ – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने लखनौ येथे ब्राह्मण समाजाचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या परिषदेला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्ण मिलन शुक्ला यांची विशेष उपस्थिती होती. परमार्थ ट्रस्ट आणि एकात्मिक ब्राह्मण महासंघाच्या बॅनरखाली आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल ताज पॅलेस येथे करण्यात आले होते.

उत्तर प्रदेशात ब्राह्मणांची संख्या जास्त आहे. असे असतानाही आजपर्यंत त्यांच्या विकासासाठी, उन्नतीसाठी, रोजगारासाठी, न्यायासाठी काहीही झालेले नाही.यामुळे आता ब्राह्मण आपल्या अस्तित्वाची लढाई ब्राह्मण परिषदेच्या माध्यमातून लढत आहे. कार्यक्रमात ना.आठवले यांचा ब्राह्मण समाजातर्फे सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान आठवले यांनी ब्राह्मणांना न्याय, रोजगार, विकास आदी मुद्द्यांवर आश्वासन दिले. ब्राह्मण समाजाच्या मदतीने पक्ष निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी आठवले म्हणाले की, उत्तर प्रदेशमध्ये पक्ष ब्राह्मणांच्या मदतीने निवडणूक लढवणार आहे. ब्राह्मण समाजाने ही एका आवाजात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (आठवले) पाठिंबा जाहीर करण्याची घोषणा केली.कार्यक्रमादरम्यान कृष्ण मिलन शुक्ला यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ब्राह्मणांना शिक्षणात आरक्षण देण्याचा पक्षाचा निर्धार आहे. राज्यातील ब्राह्मणांसाठी पक्ष काम करेल. यावेळी परमार्थ ट्रस्टचे अध्यक्ष व ज्येष्ठ अधिवक्ता ब्रदिप्रसाद पांडे यांनीही मनोगत व्यक्त केले.