गहू आणि तांदळाच्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी सरकार उचलणार आता ‘हे’ पाऊल

नवी दिल्ली – गहू आणि तांदळाच्या किरकोळ बाजारातल्या किंमती स्थिर ठेवण्यासाठी सरकार 50 लाख टन गहू आणि 25 लाख टन तांदूळ विक्रीस काढणार आहे. अन्न महामंडळ इ- लिलावाच्या माध्यमातून खुल्या बाजारात टप्प्याटप्प्यानं ही विक्री करणार आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा (Sanjeev Chopra, Secretary, Ministry of Food and Civil Supplies) यांनी काल पत्रकारांना या बाबतची माहिती दिली.

अनेक मोठ्या विक्रेत्यांनी गव्हाचा मोठा साठा केला असून त्यामुळे बाजारातल्या गव्हाच्या किंमती वाढत आहेत. मात्र गहू आणि तांदळाचा पुरेसा साठा देशात असून अन्नधान्याच्या किंमती आटोक्यात राखण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं चोप्रा म्हणाले.

गव्हाच्या किंमतीमध्ये गेल्या वर्षात किरकोळ बाजारात सहा टक्क्यांनी आणि घाऊक बाजारात सात टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच बरोबर तांदळाच्या किंमतीमध्ये किरकोळ बाजारात 10 टक्क्यांनी आणि घाऊक बाजारात 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे.