अखेर नवाब मलिकांना जामीन मंजूर, सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा

Nawab Malik राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टाने मलिकांना दिलासा देताना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. प्रकृतीचं कारण देत वैद्यकीय जामीन मिळावा अशी याचिका नवाब मलिक यांनी केली होती. मलिकांची ही मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केली.(Nawab Malik was finally granted bail).

नवाब मलिक हे फेब्रुवारी 2022 पासून म्हणजेच जवळपास दीड वर्षांपासून कारावासात होते. यापूर्वी हायकोर्टाने मलिकांना वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास नकार दिला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाने कोणताही विरोध न करता, जामीन मंजूर केला.

नवाब मलिक यांना किडनीचा आजार आहे. त्यांची किडनी निकामी झाली आहे. या आजारावर उपचारासाठी जामीन मिळण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली होती. मलिक हे आजारी असल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात पटवून दिले. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील निकालांचा संदर्भ दिला. यामुळे मलिक जामीनासाठी पात्र असल्याचा दावा केला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा हा अर्ज मंजूर करत वैद्यकीय कारणासाठी दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला.