जाणून घ्या नेमकं राज ठाकरे-वसंत मोरेंच्या बैठकीत काय झालं?

मुंबई –   मशिदींवरील भोंगे काढून न टाकल्यास त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी झालेल्या मेळाव्यामध्ये घेतली होती. त्यानुसार काही भागात मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसेचा जाप देखील सुरू केला.

दरम्यान, मनसेचे पुणे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी मात्र या भूमिकेच्या विरोधात भूमिका घेत शहरात भोंगे लावणार नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे मनसेमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्याचाच परिणाम म्हणून मोरे यांची पुणे शहर अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून ते राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोरे यांनी आपल्या पक्षात यावे यासाठी पायघड्या घातल्या असताना आता आज वसंत मोरे यांची अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली आहे. या भेटीत शंकाचं निरसन झालं असून, साहेबांनी उद्याच्या ठाण्याच्या सभेला यायला सांगितलं आहे, असं म्हणत वसंत मोरे यांनी भेटीनंतर महत्त्वाची माहिती दिली.

भेटीनंतर माध्यमांशी बोलताना वसंत मोरे म्हणाले, माझ्या सगळ्या शंका दूर झाल्या आहेत. माझं सगळं बोलणं झालंय. मला ठाण्याच्या सभेला यायला सांगितलं. ठाण्याच्या सभेला ये, तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, असं राज ठाकरे मला म्हणाले आहेत. मला आणि साईनाथ बाबर यांना बोलवलं आहे.

उद्या सभा झाल्यानंतर सगळ्यांसोबत राज ठाकरे बोलणार आहे. भेटीनंतर मी शंभर टक्के समाधानी आहे. समाधानी होऊनच मी इथून चाललो आहे. उलट सुलट चर्चा केल्या जात होत्या, मात्र मी मनसेमध्ये आहे आणि मनसेमध्येच राहणार आहे, असं वसंत मोरे यांनी सांगितलं.