शेतमालाचे उच्च दर्जाचे अधिक उत्पादन काढा; अजित पवार यांचे शेतकऱ्यांना आवाहन

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते शिवाजीनगर येथे कृषी विभाग आणि ‘आत्मा’ यंत्रणेच्या माध्यमातून ‘विकेल ते पिकेल’ अभियानांतर्गत आयोजित तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन झाले. तांदूळ आणि इतर कृषिमाल विक्रीच्या स्टॉलला भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत शेती परवडण्यासाठी उच्च दर्जाचे आणि अधिक उत्पादन काढा असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

साखर संकुलाशेजारी कृषी भवन इमारतीच्या पाठीमागे या तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यास पवार यांनी भेट देऊन स्टॉलधारक शेतकऱ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार, जिल्हा परिषदेचे कृषी समिती सभापती बाबुराव वायकर, कृषी संचालक डॉक्टर सुभाष नागरे, विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे आदी यावेळी उपस्थित होते.

तांदळाचे एकरी उत्पादन किती निघते असे एका शेतकऱ्याला प्रश्न विचारत असता कमी उत्पादन असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी केवळ वेगळ्या वाणाचे चांगल्या प्रतीचे उच्च दर्जाचे कृषी उत्पादन असून चालणार नाही तर दर्जासोबत उत्पादनही जास्तीत जास्त पाहिजे, त्याशिवाय शेती परवडणार नाही असे उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांना सांगितले. सोयाबीन आणि कापसाच्या उत्पादनवाढीसाठी अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचे ते म्हणाले.