जलसाक्षर पिढी घडविण्याची गरज; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे प्रतिपादन

मुंबई – जल संवर्धनासारख्या विषयांवर देशाची ही पिढी गांभीर्याने विचार करेल त्यावेळेस देशाचे भविष्य उज्ज्वल असेल. त्यामुळे पाणी या घटकावर सर्वसमावेशक विचारमंथन होणे गरजेचे आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे, त्याचबरोबर आता जलसाक्षर पिढी घडविण्याची गरज असून तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत (Gajendra Singh Shekhavat) यांनी केले आहे. २०२४ सालापर्यंत प्रत्येक घरात पिण्याचे पाणी पोहोचविणार असा मानसही शेखावत यांनी व्यक्त केला.

विलेपार्ले येथील बी.जे.सभागृहात मंगळवारी ब्रम्हा रिसर्च फाऊंडेशन आयोजित ‘इंडिया वाॅटर व्हिजन 2040 अँड बेयाँड’ (India Water Vision 2040 and beyond) ही एकदिवसीय राष्ट्रीय जल परिषद पार पडली. याप्रसंगी, उद्घाटन समारंभात केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी जल संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. परिषदेच्या उद्घानाप्रसंगी केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar), फाऊंडेशनचे संस्थापक संचालक डॉ. विजय पागे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन सोहळा पार पडला. याप्रसंगी, भाजपा आमदार अमित साटम, स्थानिक नगरसेविका अलका केरकर, यूपीएल ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ राहुल बजोरिया आणि लेफ्टनंट जर्नल शैलेश तिनईकर आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री यांनी शेखावत यांनी देशातील जलव्यवस्थापनाची सद्यस्थिती विशद करताना सांगितले, शासनाकडून जलव्यवस्थापन वा संवर्धनाच्या क्षेत्रात सुरु असणाऱ्या प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यासाठी चार घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यात राजकीय इच्छाशक्ती, सार्वजनिक स्वरुपातील निधी, सार्वजनिक कृतीशील धोरण आणि लोकसहभाग यांचा समावेश आहे. त्यामुळे जलव्यवस्थापनात अग्रक्रमी पोहोचण्यासाठी भविष्यात जलसाक्षर पिढी घडविण्याची गरज आहे, हे सर्व जलसमृद्धीच्या माध्यमातून शक्य आहे. जलसमृद्धी ही केवळ लोक सहभागातून घडणार आहे, त्यामुळे पाण्याचे मूल्य सामान्यांनी ओळखले पाहिजे.

देशात सर्वांत जास्त पाऊस हा २०-२२ दिवसांत पडतो. त्यामुळे या पाण्याचे उत्पादन मूल्य घटते. परिणामी, जल जतन- संर्वधनासाठी खऱ्या अर्थाने रेन हार्वेस्टींगची अधिक गरज आहे. याविषयी, शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून सामान्यांचा या उपक्रमातील सहभागही वाढायला हवा. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवायचा असेल तर सर्वप्रथम शेतीतील पाणी वाचविण्याकडे लक्ष वेधले पाहिजे. भविष्यात जलस्त्रोत जपण्यासाठी आताच्या पिढीला हे स्त्रोत माहिती असणे गरजेचे आहे, त्या दृष्टीने पाणथळ जमिनी, तंत्रज्ञानाच्या साथीने जलव्यवस्थापन – पुर्नवापर अशा अनेक क्षेत्रात शासनाकडून काम सुरु आहे अशी माहिती समारोपाप्रसंगी शेखावत यांनी दिली.

राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी जल सुरक्षेचे गांभीर्य घेऊन केंद्र आणि राज्य स्तरावर सरकारने जलस्रोत टिकवून ठेवण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी आणि धोरणात्मकरित्या राबविण्यासाठी सूक्ष्मपणे नियोजन केले पाहिजे, असे मनोगत ब्रह्मा रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक संचालक डॉ. विजय पागे यांनी व्यक्त केले.