अजित पवारांची इमेज खराब करून सुप्रिया सुळेंना पुढे आणण्याचा हा डाव असेल का…?

मुंबई – मनसे मेळाव्यातील भाषणानंतर झालेल्या टीकेला पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेतून उत्तर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेवर राज यांनी पुन्हा एकदा हल्ला चढवला. या सभेनंतर महाविकास आघाडीकडून राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं जात आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात पवार घराण्याकडून झालेल्या टीकेचा समाचार घेतला. ते म्हणाले,  सुप्रिया सुळे म्हणतात, लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटिशीने बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी रेड पडत नाही याचं कारण मला कळेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे ‘सुळे’ वेगळे आहेत. अजित पवारांकडे रेड पडते. त्यांच्या सख्ख्या बहिणींकडे रेड पडते. त्यानंतरही शरद पवार आणि नरेंद्र मोदींचे अत्यंत मधुर संबंध राहतात. कसे? मी कधी बघितलं नाही शरद पवारांना भडकलेले. मी उघडपणे बोलत होतो, तेव्हा या सगळ्यांच्या शेपट्या आत होत्या.असा घणाघात त्यांनी केला.

दरम्यान, आता मनसेचे नेते योगेश चिले (yogesh chile) यांनी राज ठाकरे यांचीच भूमिका पुढे नेणारे ट्वीट केले आहे. ते म्हणाले,  मोठे पवार मोदींना भेटल्यानंतर अजित पवार यांच्या घरी रेड पडते… पण सुप्रिया सुळेंच्या घरी पडत नाही… बहुतेक अजित पवारांनीच हि खंत मा. राजसाहेबांसमोर मांडली असावी… अजित पवारांची इमेज खराब करून सुप्रिया सुळेंना पुढे आणण्याचा हा डाव असेल का…?सिल्वर ओक वरचा हल्ला हा सुप्रिया सुळे यांची  Iron Lady हि इमेज बनवण्यासाठी होता का..?  अनेक प्रश्न आहेत…पण पवार साहेबांनीही त्यांची ‘बेभरोसी’… ‘अविश्वासु’ हि जगमान्य इमेज कायम राखल्याबद्दल त्यांचे अभिनंदन… असं चिले यांनी म्हटले आहे.