आता दरवर्षी ‘या’ तारखेला ‘वीर बाल दिवस’ साजरा केला जाणार; मोदींची मोठी घोषणा 

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जाहीर केले की, 10 वे शीख गुरू गुरु गोविंद सिंग यांच्या चार पुत्रांना श्रद्धांजली वाहण्यासाठी यावर्षीपासून 26 डिसेंबर हा वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जाईल. पंतप्रधान मोदी म्हणाले की, साहिबजादांच्या धैर्याला आणि त्यांच्या न्यायाचा पाठपुरावा करण्यासाठी ही योग्य श्रद्धांजली असेल. गुरु गोविंद सिंग यांच्या प्रकाश पर्व निमित्त पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली.

पंतप्रधान मोदींनी ट्विट केले की, ‘साहेबजादांच्या’ धैर्याला आणि न्याय प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना ही योग्य श्रद्धांजली आहे. गुरु गोविंद सिंग यांच्या चार मुलांची मुघलांनी हत्या केली. गुरु गोविंद सिंग यांच्या चार साहिबजादांना श्रद्धांजली म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे.

ते पुढे म्हणाले की, श्री गुरु गोविंद सिंग आणि चार साहिबजादांचे शौर्य आणि आदर्श यांनी लाखो लोकांना बळ दिले. अन्यायापुढे त्यांनी कधीही डोके टेकवले नाही. त्यांनी सर्वसमावेशक आणि सुसंवादी जगाची कल्पना केली. त्यांच्याबद्दल अधिकाधिक लोकांना माहिती मिळणे ही काळाची गरज आहे.

पश्चिम दिल्लीचे भाजप खासदार प्रवेश साहिब सिंह म्हणाले की, 2018 मध्ये मी एक मोहीम सुरू केली आणि संसदेच्या प्रत्येक खासदाराला भेटून स्वाक्षरी मोहीम सुरू केली की 4 साहिबजादांच्या बलिदान दिनी 26 डिसेंबर रोजी बालदिन साजरा केला जावा. आज हे ऐतिहासिक कार्य पूर्ण केल्याबद्दल आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी मनापासून आभार मानतो.