संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा निखळला – जयंत पाटील

मुंबई – भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. अनेक दशकं भारतात आणि भारताबाहेर संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज आज हरपला आहे. संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा निखळला अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केली आहे.

लतादीदी जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांनी गायलेली गीते आपल्यात कायम राहतील. मला आठवतंय की एक वेळ होती, जेव्हा सकाळी रेडिओ ऑन करून दिदींच्या आवाजाने अनेकांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. त्यांनी गायलेले ‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन देत त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला त्यावेळचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्या आवाजाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केले, ते स्वर आणि सूर आता दिदींच्या स्मृती सदैव तेवत ठेवेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि परिवाराच्यावतीने जयंत पाटील यांनी भावपूर्ण आदरांजली अर्पण केली आहे.