सोमय्या यांच्यावरील हल्ला निषेधार्ह; या तालिबानी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो – संभाजी ब्रिगेड

पुणे – पुणे महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यासाठी पुणे महापालिकेत शनिवारी भाजपा नेते किरीट सोमय्या आले, मात्र पालिकेच्या पायऱ्यांवरच शिवसैनिकांनी निदर्शने करत त्यांचा रस्ता अडवला.

यावेळी झालेल्या गोंधळात किरीट सोमय्या यांना धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे ते खाली पडले. सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून तातडीने सोमय्या यांना गाडीत बसविले आणि सोमय्या यांना परतावे लागले. गोंधळात खाली पडल्यामुळे सोमय्या यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

या हल्ल्याबाबत अनेकांनी विवेकवादी भूमिका घेवून या घटनेचा निषेध नोंदवला आहे तर काहींनी नेहमीप्रमाणे सोयीचे मौन बाळगले आहे. दरम्यान, या घटनेवर आता संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी आपली रोखठोक भूमिका जाहीर केली आहे. ते म्हणाले, मा. किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला निषेधार्ह आहे. सत्ताधारी असले म्हणून तुम्ही इतर नेत्यांवर हल्ले करणार असाल तर अशाने महानगरपालिकेवर सत्ता मिळणार नाही. सोमय्या यांनी सुद्धा सुडाचे राजकारण करू नये. मनपा निवडणुकीचे राजकारण पाहता पुण्यात कायदा-सुव्यवस्था उरलेली नाही, याचं दर्शन आज झाले.

पक्ष कोणताही असो, सूडबुद्धीने राजकारण कोणीही करू नये. मात्र किरीट सोमय्या यांना ‘पायऱ्यावर घसरून माकड हाडापर्यंत मार लागणे म्हणजे त्यांच्या जिवाला धोका होणारी घटना आहे. चक्क पिटाळून लावले.’ या तालिबानी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो… मात्र शिवसेनेची सुद्धा भूमिका समजून घेतली पाहिजे. किरीट सोमय्या यांनी भाजपने पुणे महानगर पालिकेत केलेल्या भ्रष्टाचारावर सुद्धा बोललो पाहिजे. मात्र सूडबुद्धीने व सोयीने राजकारण करण्याच्या नादात ते खालच्या पातळीला जाऊन राजकारण करतात कदाचित त्याचीच शिवसेनेने किरीट सोमय्या यांना पोचपावती दिली असावी. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असाच प्रकार दिसतो…! असं शिंदे यांनी म्हटले आहे.