कॉंग्रेसने स्टार प्रचारक म्हणून ज्या नेत्यावर जबाबदारी सोपविली त्याच नेत्याने दिला राजीनामा

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश निवडणुकीच्या  तोंडावर काँग्रेसला जोरदार झटका बसला असून, दिग्गज नेते आरपीएन सिंह यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. ते आज भारतीय जनता पक्षामध्ये (Bjp) प्रवेश करणार असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरपीएन सिंह यांना स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात कुशीनगरच्या पडरौना विधानसभा मतदार संघातून मैदानात उतरवण्याची तयारी भाजपने केलीय.

स्वामी प्रसाद मौर्य हे सध्या पडरौनाचे आमदार आहेत. अलीकडेच मौर्य यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा देऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. आरपीएन सिंह हे काँग्रेस पक्षाकडून तीन वेळा आमदारही राहिले आहेत. याशिवाय त्यांनी 4 वेळा लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावले आहे, मात्र त्यांना एकदाच यश मिळाले आहे.1999 च्या लोकसभा निवडणुकीत आरपीएन सिंह तिसऱ्या क्रमांकावर होते. 2004 मध्ये त्यांनी दुसरे स्थान पटकावले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत, रतनजीत प्रताप नारायण सिंह (RPN सिंह) यांनी निवडणुकीत विजय मिळवला आणि UPA-II सरकारमध्ये भूपृष्ठ वाहतूक आणि रस्ते राज्यमंत्री, पेट्रोलियम राज्यमंत्री आणि गृह राज्यमंत्री होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आरपीएन सिंह यांचा भाजप उमेदवार राजेश पांडे यांनी 85,540 हजार मतांनी पराभव केला होता.

दरम्यान, आरपीएन सिंह यानी आपले ट्वीटर हँडर बदलले आहे. त्यांनी काँग्रेस पक्षासंबंधीच्या पदाची माहिती तिथून हटवली आहे. शिवाय त्यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणतात, सारा देश प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा करत आहे. मी आपल्या राजकीय जीवनात नव्या अध्यायाला सुरुवात करतोय. जयहिंद. विशेष म्हणजे काँग्रेसने कालच आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. त्यात आरपीएन सिंह यांचे नावही होते.