आजपासून शाळेत पुन्हा सुरु होणार किलबिलाट

पुणे – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बंद असलेले महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातल्या शाळांचे प्रत्यक्ष वर्ग आजपासून पुन्हा सुरू होणार आहेत. राज्यभरातल्या पालकांची मागणी, कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागण्याचं कमी असलेलं प्रमाण यासारख्या कारणांमुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी शाळांमधले प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. दरम्यान, कोविड परिस्थिती बघून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी राज्य सरकारनं जिल्हा प्रशासनांवर सोपवली आहे.

दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात तब्बल सातशे दिवस शाळा बंद होत्या. त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा धोका कमी झाला आहे अशा जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. परंतु, शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार ज्यांना योग्य वाटतं त्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे. ज्यांना वाटते रिस्क घेऊ नये त्यांनी घेऊ नये. उद्यापासून शाळा सुरू होत असल्या तरी पुढची पावलं कशी टाकयची हे शाळा आणि पालकांनी ठरवायचे आहे, असे मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेने स्थानिक स्तरावर पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या शाळा 24 जानेवारीपासून सुरू करण्यासंदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. पुण्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी आठवडाभर पुढे ढकलण्यात आला आहे. तर, नागपुरात 26 जानेवारीनंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. नाशिकमध्ये मात्र सोमवारपासून शाळा सुरु करण्यात येणार आहेत. नाशिकमधील पहिली ते बारावीच्या शाळा सोमवारपासून सुरु होणार आहेत. तर शाळेत विद्यार्थी कोरोनाबाधित आढळल्यास पुन्हा शाळा बंद करण्यात येईल. अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिलीय. यवतमाळ जिल्ह्यातील शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. नववी वी ते 12 वी पर्यंतचे सर्व वर्ग होणार सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलीय.