डिलिव्हरी एजंटच्या मृत्यूनंतर झोमॅटोने घडवले ‘असे’ माणुसकीचे दर्शन

नवी दिल्ली-  झोमॅटोने रस्ता अपघातात आपला जीव गमावलेल्या सलील त्रिपाठीच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने  जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली. झोमॅटोने सांगितले की, सलील त्रिपाठी यांच्या निधनामुळे कंपनीला खूप दु:ख झाले आहे आणि अपघात झाल्यापासून कंपनी त्यांच्या कुटुंबासोबत आहे.

Zomato चे संस्थापक दीपंदर गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,  आम्ही सलील त्रिपाठी यांच्या अंत्यसंस्काराच्या खर्चासह कुटुंबाला आधीच मदत करत आहोत आणि कुटुंबाला शक्य ती सर्व मदत देण्याचा प्रयत्न करत आहोत. कंपनी सलील त्रिपाठीच्या कुटुंबाला रु. 10 लाखांचा कौटुंबिक विमा प्रदान करेल. शिवाय, Zomato  कर्मचाऱ्यांनी कुटुंबासाठी स्वतंत्रपणे सुमारे 12 लाख रुपये उभे केले आहेत.

झोमॅटोने सांगितले की ते सलील त्रिपाठी यांची पत्नी सुचेता यांनाही नोकरी देईल.झोमॅटोने एका निवेदनात म्हटले आहे की, सलीलच्या कुटुंबाप्रती दाखविलेल्या अपार काळजी आणि दयाळूपणाबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत. या कठीण काळात त्यांना आवश्यक आर्थिक आणि भावनिक आधार मिळावा यासाठी आम्ही दुःखी कुटुंबासोबत राहू, हे वेगळे सांगायला नको.

सलील त्रिपाठी, 38, उत्तर-पश्चिम दिल्लीच्या रोहिणी येथे ऑर्डर देण्यासाठी जात असताना दिल्ली पोलिसांच्या एका हवालदाराने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत सलीलच्या  दुचाकीला कारने धडक दिली.  घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला रुग्णालयात नेले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे.सलील त्रिपाठी पूर्वी दिल्लीतील एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये मॅनेजर होते. ;कोरोनाव्हायरसच्या वेळी रेस्टॉरंट बंद झाल्यामुळे त्याची नोकरी गेली असली तरी, तेव्हापासून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अन्न वितरणाचे काम करत होता. तो त्याच्या कुटुंबाचा एकमेव कमावणारा होता.