म्हापश्यातील सर्व नगरसेवक एकदिलाने काम करून जोशुआला निवडून आणणार – वायंगणकर

म्हापसा – भारतीय जनता पक्षाचे म्हापसा मतदार संघातील उमेदवार जोशुआ डिसुझा यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन गोवा भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी बोलताना म्हापसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांनी या भागातील आमचे १२ नगरसेवक हे एकदिलाने भाजपचा उमेदवार निवडून देण्यासाठी झटणार असल्याचं स्पष्ट केले आहे.

त्या म्हणाल्या, म्हापसा हा भाजप चा बालेकिल्ला आहे. त्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे कि या मतदार संघातील लोकं हा पुन्हा एकदा भाजपचा उमेदवार निवडून देणार. म्हापश्याचा विकास आहे तो थांबलेला नसून गतीबद्ध पद्धतीने सुरु आहे. कचऱ्याचा विषय सध्या ऐकायला मिळतोय पण त्यावर उपाय देखील केले जात आहेत. अनेक कामे नव्याने केली जातील यासाठी जोशुआ डिसुझा यांना निवडून देण्याचे मी आवाहन करते असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, यावेळी माजी आमदार दयानंद मांजरेकर यांनी देखील भाषण केले. ते म्हणाले, दिवंगत फ्रान्सिस डिसुझा हे माझे मित्र होते. त्यांनी या मतदार सघांत बरीच विकासकामे केली आहेत. खूप लोकांची मदत देखील केली आहे. या मतदार संघातील मतदार त्यांना भरघोस मतांनी निवडून द्यायचे. तसेच जेव्हा त्याचे निधन झाल्यानंतर जोशुआने जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा लोकांनी त्याला देखील भरघोस मतांनी निवडून दिले. आता सुद्धा मला पूर्ण विश्वास आहे कि या मतदार संघातील मतदार जोशुआ यांना पुन्हा एकदा निवडून देतील. मी सर्वतोपरी सहकार्य करणार असून जोशुआला या निवडणुकीसाठी आणि विजयासाठी शुभेच्छा देतो.