गोव्याच्या रणभूमीवर आता अमित शहांची एन्ट्री; भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घेणार सभा

पणजी : भारताचे गृहमंत्री व भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते गृहमंत्री अमित शहा हे आज गोव्यात येत असून ते दोन जाहीर सभासह एकूण तीन ठिकाणी प्रचारात सहभागी होतील. त्यांच्या सभांचे थेट प्रक्षेपण विविध माध्यमातून केले जाणार आहे. काल पणजी येथील भाजपाच्या प्रचार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी ही माहिती दिली. यावेळी भाजपाचे प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते .

यावेळी बोलताना तानावडे म्हणाले, की ११ जानेवारीपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी , भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा , गृहमंत्री अमित शहा , मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण , तसेच केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री स्मृती इराणी व इतर नेत्यांच्या सभा गोव्यात भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ होणार आहेत.

३० रोजी अमित शहा हे गोव्यात येत असून संध्याकाळी ४.३० वा. शिरोड व फोंडा मतदार संघातील उमेदवारासाठी हॉटेल सनग्रेस गार्डनमध्ये अमित शहा यांची सभा होणार आहे. कोरोनामुळे मोजक्याच कार्यकर्त्यांना तेथे बोलावण्यात आले असून अमित शहा यांच्या सर्व सभा राज्यातील विविध भागात स्क्रीन उभारून, सभागृहांमध्ये आणि खुल्या जागेतस्क्रीन द्वारे त्याचे थेट प्रक्षेपण केले जातील. फेसबुकवर व व्रुतवाहिनीवर या सभा थेट दाखवल्या जातील अशी माहिती तानावडे यांनी दिली.

दुसरी सभा शारदा इंग्लिश हायस्कूल सावर्डे येथे सावर्डे मतदारसंघाचे भाजप उमेदवार गणेश गावकर यांच्या प्रचारार्थ होणार असून ती ५.२० वा . होईल. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता वास्को येथे अम्ब्रेला कॅम्पेनचे उद्घाटन होणार आहे. यामुळे राज्यभरातील सर्व मतदारसंघात प्रचार प्रचाराला सुरुवात होणार आहे.

रेल्वे सभागृहात आयोजित या कार्यक्रमांमध्ये अमित शहा मार्गदर्शन करणार आहेत. एकूण तीन सभांमध्ये मोजक्या कार्यकर्त्यांना सहभागी करुन घेतले जाईल. कोरोना नियमाचे पालन करून या सभा होणार आहेत .राज्यभरात भाजपाचा प्रचार जोरात सुरू असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावेळी स्वबळावर भाजपाचे गोव्यात सरकार येणार असल्याचा विश्वास यावेळी तानावडे यांनी व्यक्त केला.