‘कुटुंब नियोजन किटमध्ये प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी जर रबरी लिंग दिले असेल तर त्यात चुकीचे काहीच नाही’

पुणे – वाढती लोकसंख्या ही देशासमोरील एक मोठी समस्या आहे. यामुळेच लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपापाययोजना राबविल्या जातात. त्यामध्ये राज्य सरकारच्यासार्वजनिक आरोग्य विभागाचा मोठा वाटा असतो. या विभागाकडून कुटुंब नियोजनाचा  उपक्रम सुद्धा राबवण्यात येतोय. मात्र, राज्य सरकारकडून कुटुंब नियोजनासाठीच्या समुपदेशन किटमध्ये रबरी लिंग देण्यात आल्याचे समोर आलंय.

विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सरकारच्या या निर्णयामुळे आशा वर्कर समोर अजब समस्या निर्माण झाली आहे. कारण रबरी लिंग प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी समाविष्ट करण्यात आलं आहे. आता ते घेऊन गावात फिरायचे कसे? आणि प्रात्यक्षिक कसे दाखवायचे हा मुख्य सवाल असून यामुळे आशा वर्कर महिलांची कुचंबना होत आहे. दरम्यान, प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हे रबरी लिंग आशा वर्कर्सना देण्यात आले असल्याचं आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. मात्र ते कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत असं चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी एक लक्ष्यवेधी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, सार्वजनिक आरोग्य विभागाने कुटुंब नियोजन किटमध्ये ग्रामीण भागांमध्ये प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी जर  रबरी लिंग दिले असेल तर चुकीचे काहीच नाही, आशा वर्कर्सनेसुद्धा संकुचित विचार बाजूला ठेवून कुटुंबनियोजन करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये  पुढाकार घेऊन अशा पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखवण्याची आता गरज निर्माण झाली आहे.

आम्ही हे कसे दाखवू ,ग्रामीण भागातील महिला काय म्हणतील असा जर आपण संकुचित विचार आता एकविसाव्या  शतकात  करत बसलो तर कुटुंबनियोजनाच्या गप्पा हवेतच राहतील. कुटुंब नियोजनाच्या या किटचे भूमाता ब्रिगेडच्या वतीने आम्ही स्वागतच करतो.आशा वर्कर्स पुढे व्हा आणि कुटुंबनियोजनाच्या कामाला लागा असं देसाई यांनी म्हटले आहे.