अवघ्या ५ धावांवर ५ विकेट्स घेणारा मुंबई इंडियन्सचा आकाश मधवाल आहे तरी कोण?

Akash Madhwal Biography : बुधवारी (24 मे) रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आयपीएल 2023 एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सचा गोलंदाज आकाश मधवालने (Akash Madhwal) लखनऊ सुपरजायंट्सच्या फलंदाजांवर कहर बनून बरसला. आकाशने 3.3 षटकात 5 धावा देत 5 विकेट्स घेतले. अशा भेदक गोलंदाजीनंतर आकाशचे सर्वत्र कौतुक झाले आणि त्यामुळेच आकाश मधवाल पहिल्यांदाच सोशल मीडियावर प्रकाशझोतात आला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की या 29 वर्षीय गोलंदाजाने त्याच्या निम्म्याहून अधिक वयात लेदर बॉलला हातही लावला नाही.

आकाशचे वडील सैन्यात होते
25 नोव्हेंबर 1993 रोजी उत्तराखंडमधील रुरकी जिल्ह्यातील गढवाल येथे जन्मलेल्या या गोलंदाजाने सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. वडिलांनी भारतीय सैन्यात राहून देशाची सेवा केली आहे आणि आई गृहिणी आहे. आता आकाश  क्रीडा क्षेत्रात देशाचे नाव कमावण्यासाठी सज्ज झाला आहे.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत निर्माण झाली क्रिकेटची आवड
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच आकाशला कॉलेजमध्ये क्रिकेटची आवड निर्माण झाली. याआधी तो फक्त टेनिस बॉलने क्रिकेट खेळला होता आणि क्रिकेटचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते. अशा स्थितीत एके दिवशी आकाश उत्तराखंडच्या क्रिकेट टीमसाठी चाचणी देण्यासाठी पोहोचला.

क्रिकेट कारकीर्द 2019 मध्ये सुरू झाली
यानंतर आकाश टेनिस बॉल ऐवजी लेदर बॉलने खेळू लागला आणि त्यामुळे त्याची गोलंदाजी दिवसेंदिवस सुधारू लागली. 2019 मध्ये, त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तराखंडसाठी टी20 पदार्पण केले. 2019 मध्ये आकाशने रणजी ट्रॉफीमध्ये उत्तराखंडचे प्रतिनिधित्व केले.

2022 मध्ये आयपीएलमध्ये सामील झाला
2022 मध्ये सूर्यकुमार यादवच्या जागी आकाशचा मुंबई इंडियन्समध्ये समावेश करण्यात आला होता. अशा परिस्थितीत गेल्या वर्षी एकाही सामन्यात त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. आता या वर्षी आकाश भाग्यवान ठरला आणि एलिमिनेटर सामन्यात त्याचा प्रभावशाली खेळाडू म्हणून उपयोग झाला. 2023 मधील स्पर्धेदरम्यान, मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला मोसमाच्या मध्यभागी दुखापत झाल्यानंतर आकाशला संधी देण्यात आली होती. ती संधी त्याने दोन्ही हातांनी घट्ट पकडत संधीचे सोने केले आहे.