वीस वर्षीय टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची आत्महत्या, कॅटरिना-सलमान सोबत केले होते काम

Tunisha Sharma Suicide: ‘अलीबाबा दास्तान-ए-काबुल’ सीरियलची अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आज सेटवर आत्महत्या केली आहे. तुनिषाचे वय केवळ २० वर्षे होते. ती टेलिव्हिजन जगतातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. ती गेल्या काही दिवसांपासून सेटवर खूप तणावात दिसत होती. यानंतर आता तिने मेकअप रूममध्ये गळफास लावून घेतला असल्याचे धक्कादायक वृत्त पुढे आले आहे. तिच्या आत्महत्येनंतर टीव्ही इंडस्ट्रीतून शोक व्यक्त केला जात आहे.

‘भारत का वीर पुत्र- महाराणा प्रताप’ या सीरियमधून तुनिषाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. यानंतर तिने चक्रवर्ती अशोक सम्राट, गब्बर पूचवाला, शेर-ए-पंजाब- महाराजा रणजीत सिंह, इंटरनेट वाला लव, इश्क सुभान अल्लाह आणि काबुलमधील अलीबाबा दास्तान-ए-काबूल या टीव्ही सीरियलमध्येही काम केले होते. ती शेवटची अलीबाबा दास्तान-ए-काबुलमध्ये दिसली होती. या शोमध्ये तिने राजकुमारी मरियमची भूमिका साकारली होती.

याच सीरियलच्या सेटवर तिने आत्महत्या केली असल्याचे समजत आहे.  माध्यमांतील वृत्तांनुसार, तुनिषा शनिवारी तिचा को-स्टार शीजानच्या मेकअप रूममध्ये पोहोचली. यावेळी शीजान शूटिंगमध्ये व्यस्त होता. शीजान म्हणाला की, “आपला शॉट संपल्यानंतर तो मेकअप रूममध्ये जाण्यासाठी आला. तेव्हा त्याला मेक रूमचे दार आतून बंद दिसले. त्याने अनेकदा दार वाजवले, आवाज दिला, पण आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्याने मेकअप रूमचा दरवाजा तोडला आणि आतमध्ये तुनिषा बेशुद्ध अवस्थेत आढळली. त्यानंतर त्वरित तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.”

घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिस घटनास्थळी पोहोचली आणि तपास सुरू केला. पोलिस अलीबाबा सीरियलच्या यूनिटच्या सदस्यांशी विचारपूस करत आहेत.

दरम्यान तुनिषा शर्माने फितूर, बार बार देखो, कहानी 2, दुर्गा रानी सिंह आणि दबंग 3 मध्ये देखील काम केले आहे. तिने फितूर आणि बार बार देखो मध्ये तरुण कतरिना कैफची भूमिका साकारली होती. त्याच वेळी, ती कहानी 2 आणि दुर्गा राणी सिंहमध्ये विद्या बालनच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. तिने सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या दबंग 3 मध्येही कॅमिओ केला होता.