अमोल कोल्हे नथुरामच्या भूमिकेचं मानधन परत करणार का?

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेतून घराघरात आणि जनतेच्या मनात पोहोचलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी ‘मैंने गांधी को क्यों मारा’ (Why I Killed Gandhi) या चित्रपटाच्या माध्यमातून नथूराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.

दरम्यान, काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांकडूनही त्यांच्या भूमिकेवरून टीकेची झोड उठवण्यात आली आहे. कॉंग्रेस नेत्यांनी तर या चित्रपट प्रदर्शनास विरोधही दर्शवला होता.यानंतर अमोल कोल्हे यांनी देखील आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून आले. परंतु, राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या विविध चर्चा काही थांबल्या नाहीत. राज्यातील मित्र पक्ष असणाऱ्या काँग्रेसने देखील यावरून आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी अखेर नथुराम गोडसेच्या भूमिकेबद्दल आळंदीत आत्मक्लेश केला.

नथुरामची भूमिका केली म्हणून आत्मक्लेश करणारे अमोल कोल्हे या भूमिकेसाठी मिळालेले मानधान परत करणार का? असा प्रश्न नागपुरातील भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केला आहे. तसेच पुछता है भारत, असंही त्यांनी म्हटलं आहे.