उद्धव ठाकरेंनी आता शिवसेना भवनात बसणार असल्याचं जाहीर केलं, पण पक्षाचं भवितव्य काय ? 

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील गोंधळ बुधवारी उध्दव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने काहीसा शांत झाला. यासोबतच आपण आमदारपदही सोडत असून आता शिवसेना भवनात बसणार असल्याचेही उद्धव यांनी सांगितले.

मुख्यमंत्रीपद सोडत उद्धव ठाकरेंनी आता शिवसेना भवनात बसणार असल्याचं जाहीर केलं, पण पक्षाचं भवितव्य काय, हा प्रश्नच आहे. शिवसेनेचे बहुतांश आमदार बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असून, अशा स्थितीत खरा पक्ष कोणता, हे आधी ठरवावे लागेल. पक्षातच उद्धव गट अल्पमतात असल्याने आपली शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे एकनाथ शिंदे यांनी आधीच सांगितले आहे. अशा स्थितीत आता शिवसेनेच्या दोन गटांमध्ये आगामी काळात संघर्ष पाहायला मिळू शकतो.

सोशल मीडियावर LIVE भाषणात राजीनाम्याची घोषणा करताना ते म्हणाले, ‘माझ्याकडे शिवसेना आहे. मला शिवसैनिकांचे रक्त सांडायचे नाही. मी कायमचा निघून जाणार नाही, मी इथेच आहे आणि पुन्हा एकदा शिवसेना भवनात बसेन. मी माझ्या सर्व लोकांना एकत्र करीन. वापरलेली भाषा चांगली नाही. सगळे बंडखोर ठाकरे कुटुंबाला विसरले. ज्यांना मी दिले ते रागावले. ज्यांनी काही दिले नाही ते त्यांच्यासोबत आहेत.असं ते म्हणाले.