…तर २०२४ची निवडणूक शेवटची ठरेल आणि देशात हुकूमशाहीचा नंगानाच सुरू होईल- उद्धव ठाकरे

Mumbai- केंद्रिय निवडणूक आयोगाने गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत निकाल दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) गटाच्या बाजूने केंद्रिय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला. यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आक्रमक झाले आहेत. या निर्णयानंतर त्यांनी शिवसेना (Shivsena) जिल्हाप्रमुखांची भेट घेत पुढील रणनिती ठरवली. यानंतर पत्रकार परिषद घेत त्यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

“शिंदे गटाने धनुष्यबाण आणि शिवसेना नाव चोरलं आहे. हा पूर्वनियोजत कट होता. त्यांनी शिवसेना नाव चोरलं असलं तरी ते ठाकरे हे नाव नाही चोरू शकत. मी माँ आणि बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलो, हे माझं भाग्य आहे. हे भाग्य त्यांना मिळू शकत नाही. दिल्लीवाले त्यांना हे भाग्य देऊ शकत नाही. आज जी परिस्थिती त्यांनी शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केला आहे, ही परिस्थिती उद्या देशातील कोणत्याही पक्षावर आणू शकतात. आताच जर यांचा सामना केला गेला नाही, तर कदाचित आगामी २०२४ ची निवडणूक ही शेवटची ठरू शकेल. त्यानंतर देशात हुकूमशाहीचा नंगा नाच सुरू होऊ शकतो”, अशी टिका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.