आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबीसींचे संघटन अधिक मजबूत करा – छगन भुजबळ

नाशिक :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्व ओबीसी घटकांना एकत्र घेऊन ओबीसींचे संघटन अधिक मजबूत करावे अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या.

छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भुजबळ फार्म येथील कार्यालयात नाशिक शहर व जिल्हा ओबीसी सेल विभागाची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, उमेश नेमाडे, डॉ.योगेश गोसावी, शहराध्यक्ष अॅड.सुरेश आव्हाड, दिलीप तुपे, संदीप शिंदे, हर्षल खैरनार, अॅड.नितीन जाधव, अॅड.सुभाष गीते, नंदा मथुरे, जयवंत धांडे, प्रकाश वाघ, सुरेश जगदाळे, शरद गायकवाड, रमेश मंडलिक, वैभव अभंग, योगेश लभडे, अजय धुमाळ, रेखा शेलार, दिपक गांगुर्डे, प्रमोद मंडलिक, बाळासाहेब गिरी, शाम तायडे, चंद्रकला कोरडे, मंगला देवरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीकडे राज्यातील नागरिकांचा कौल आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आपली तयारी पूर्ण असली पाहिजे. त्यासाठी पक्षाचे संघटन अधिक मजबूत असणे आवश्यक आहे. त्यासाठी ओबीसीमधील सर्व घटकांना एकत्र करून ओबीसींचे संघटन अधिक मजबूत करण्यात यावे. विशेषतः खा.शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम समाजातील ओबीसी वर्गाला आरक्षण मिळवून देण्याचे काम आपण केले आहे. त्यांचा सहभाग देखील यामध्ये असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांनाही यात सामवून घ्यावे अशा सूचना त्यांनी केल्या.

ते म्हणाले की, सोशल मिडिया हे सद्या अधिक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे आपल्या संघटनात तसेच नागरिकांपर्यंत आपली कामे पोहोचविण्यासाठी सोशल मिडीयाचा सकारात्मक पद्धतीने वापर करावा. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर लोकांमध्ये अधिक जनजागृती करण्यात यावी. त्यासाठी प्रत्येक घटकाला सोबत घ्यावे असे सांगत पक्ष सघटन मजबूत करत असतांना आपले गट तट बाजूला ठेऊन संघटन अधिक मजबूत करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी ईश्वर बाळबुद्धे म्हणाले की, ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. ते फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर काम करत असून त्यांचे विचार देशभरात रुजविण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली आपण जिल्ह्यातील संघटन अधिक मजबूत करून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणले पाहिजे असे ते म्हणाले. तसेच लवकरच संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तालुकावार आढावा बैठका घेतल्या जातील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.