यशवंत जाधव भीमपुत्र, ते कुणालाही घाबरणार नाहीत; महापौर पेडणेकरांचा दावा 

मुंबई – मुंबई मनपातील स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते  यशवंत जाधवांच्या   घरी आयकर विभागाकडून  (income tax raid ) छापा टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. प्राप्तिकर विभागाकडून यशवंत जाधव यांच्या माझगावमधील त्यांच्या निवासस्थानी तपास सुरु आहे.  इमारतीबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. सीआरपीएफचे जवानदेखील तैनात करण्यात आले आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. अशातच आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणाकडून होणारी चौकशी, शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.

स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) हे भीमपुत्रं आहेत. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्रं आहेत. ते कशाला कुणाला घाबरतील? ते संविधान मानणारे आहेत. कुणालाही घाबरणार नाहीत. ते असल्या धाडींना तर घाबरणारच नाही, असं महापौर किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी सांगितलं.

आयटीचेअधिकारी काही माहिती घेण्यासाठी आले आहेत. ही पाहणी आहे. त्याचा एवढा का बाऊ केला जात आहे? धाड पडली धाड पडली असं का सांगितलं जात आहे? आयटी फॉर्म भरताना काही त्रुटी राहिली असेल तर ते त्याची माहिती देतील. त्याचा बाऊ करण्याची गरज काय?, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

जाधवांवर नेमका काय आहे आरोप ?

यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोलकाता येथील शेल कंपन्यांमध्ये आर्थिक व्यवहार केल्याचं आयकर विभागाच्या यापूर्वीच्या तपासात समोर आलं असल्याची माहिती आहे. यामिनी जाधव यांनी प्रधान डीलर्स नावाच्या कंपनीकडून 1 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याचा निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख, तपासात ही शेल कंपनी असल्याचं उघड झालं.

आयकर विभाग एका हवाला एजंटचा तपास करत असताना त्याच्या मार्फत 15 कोटी रूपये काही रोख रक्कम आणि चेक स्वरूपात जाधव कुटूंबियांकडे आल्याचे दिसून आले. या उत्पन्नाची माहिती ही जाधव कुटूंबियांनी लपवली आणि त्यावर कर चुकवला नाही असा आयकर विभागाला संशय आहे.