काय सांगता ? शरद पवारांनी घातली चक्क पुणेरी पगडी !

पुणे : राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर यापुढे पुणेरी पगडीने( Puneri pagadi) कोणाचेही स्वागत करू नका, स्वागत करायचेच असेल तर महात्मा फुले यांच्या फुले पगडीने स्वागत करा असा आदेश दस्तुरखुद्द शरद पवारांनीच(sharad Pawar) दिला होते. 2018 मध्ये राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत शरद पवारांनी छगन भुजबळ(chagan Bhujbal) यांना फुले पगडी(phule pagade) घातली होती. त्यानंतर त्यांनी पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सूचनावजा आदेशच दिला होता. त्यानंतर पुणेरी पगडी विरुद्ध फुले पगडी हा वाद बरेच दिवस राज्यभर गाजत होता.

मात्र काल पुण्यात शरद पवारांचेच स्वागत पुणेरी पगडी घालून करण्यात आले. पुणेरी पगडीला विरोध करणारे पवार यांच पुण्यातील ‘जितो कनेक्ट 2022’ कार्यक्रमात पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आलाय. दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातून पुणेरी पगडी हद्दपार केल्याची घोषणाच पवारांनी त्यावेळी केली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर याच सभेत छगन भुजबळ यांनी पहिले भाषण केले होते. त्यांच्या भाषणात जात, धर्म, समाज यांना सोबत घेऊन जाऊ असे भुजबळांनी म्हटले होते. त्यानंतर पवारांनी गुगली टाकत राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात यापुढे पुणेरी पगडी नको असा हुकूमच देऊन टाकला होता. आता पवारांनी पुणेरी पगडी स्वीकारल्यानंतर हा वाद पुन्हा डोकं वर काढणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.