उद्धव ठाकरे हेच पुढची 25 वर्ष मुख्यमंत्री असतील – संजय राऊत

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीतील नेते विविध दावे करत आहेत. यातच आता उद्धव ठाकरे हेच पुढची 25 वर्ष मुख्यमंत्री असतील. सोनिया गांधी (Sonia Gandhi), शरद पवार (Sharad Pawar), सुप्रीया सुळे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वावर खूश आहेत, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत बोलताना म्हणाले की, उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असून हेच 25 वर्ष मुख्यमंत्री राहतील, असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सर्वजण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आनंदी आहेत. त्याच्यामुळे कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. असं राऊत म्हणाले.