उद्धव ठाकरेंमध्ये दम असेल, तर माझ्याविरुद्ध कोणत्याही जिल्ह्यातून निवडणूक लढून दाखवावी – नवनीत राणा

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी यांनी सिंहगर्जना केली. यावेळी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी  महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघात निवडणूक लढवावी, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढीन, असं राणा म्हणाल्या आहेत. एवढंच नाहीतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये दम असेल, तर माझ्याविरुद्ध कोणत्याही जिल्ह्यातून लढून दाखवा. मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणारच आहे. नारीशक्ती काय असते हे तुम्हाला दाखवून देऊ. तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही,” असं नवनीत राणा म्हणाल्या

मी अशी कोणती चूक केली? प्रभू श्रीरामाचं नाव घेणं, हनुमंताचं नाव घेणं चूक असेल, तर 14 दिवस काय? मी 14 वर्ष शिक्षा भोगायला तयार आहे. 14 दिवसंच काय, 14 वर्ष जरी जेलमध्ये टाकलं तरी माझा आवाज तुम्ही दाबू शकत नाही. असं त्या म्हणाल्या.

महाविकास आघाडीत सत्तेचा गैरवापर होत असल्याची तक्रार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे दिल्लीत करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं आहे. तसेच, दिल्लीत जाऊन संजय राऊतांचीही तक्रार करणार आहे, असंही त्या म्हणाल्या.