‘तुमची संपत्ती उघड केल्यास मी तुरुंगात जायला…’, उर्फी जावेदचे थेट चित्रा वाघ यांना आव्हान

मुंबई- ‘बिग बॉस फेम’ अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही नेहमीच तिच्या बोल्ड लूक्समुळे चर्चेत असते. अतरंगी कपडे घालून मुंबईच्या रस्त्यांवर फोटोग्राफर्स किंवा पॅपाराझींपुढे पोज देतानाही ती अनेकदा दिसली आहे. यामुळे तिला अनेकदा ट्रोलचा सामनाही करावा लागत असतो. मात्र यावेळी उर्फी भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा किशोर वाघ (Chitra Wagh) यांच्या नजरेत आली असून त्यांनी रविवारी तिच्याविरुद्ध मुंबई पोलिसात तक्रार (Mumbai Police) दाखल केली आहे आणि तिच्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

मॉडेल उर्फीविरोधात (Uorfi Javed) तक्रार केल्याची माहिती चित्रा वाघ यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्राची कॉपी शेअर करत दिली आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, ‘सार्वजनिक ठिकाणी उर्फी जावेदचे अंग प्रदर्शन समाजात चर्चेचा विषय बनले आहे. मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर महिलांच्या शरीराचे असे प्रदर्शन भारतीय संस्कृती आणि सभ्यतेला कलंकित करते, अशी कल्पना कोणीही केली नसेल.’

‘ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात काय करते याच्याशी आमचा काहीही संबंध नाही, पण लोकप्रियता मिळवण्यासाठी अभिनेत्री तिचे अंग दाखवते. तिला तिचे शरीर दाखवायचे असेल तर घराच्या चार भिंतीत दाखवावे, पण सार्वजनिक ठिकाणी असे प्रयत्न करू नयेत. समाजाचे असे मानसिक विकृतीकरण करण्याचा प्रयत्न करू नये. मी मुंबई पोलिसांना तिच्यावर (उर्फी जावेद) कठोर कारवाई करण्याची विनंती करतो,’ असे चित्रा वाघ यांनी पत्रात लिहिले आहे.

उर्फी जावेद काय म्हणाली?
आता चित्रा वाघ यांनी उचललेल्या या पावलानंतर उर्फीने (Urfi Javed Reply To Chitra Wagh) प्रतिक्रिया दिली आहे. तिने चित्रा वाघ यांच्याविरोधात रोखठोक भूमिका घेत इंस्टाग्राम स्टोरीद्वारे त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘मला कधीही खटला किंवा मूर्खपणा नको आहे, जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची संपत्ती उघड केली तर मी आत्ता तुरुंगात जाण्यास तयार आहे. याशिवाय तुमच्या पक्षातील अनेक नेत्यांवर वेळोवेळी छेडछाडीचे आरोप झाले आहेत, त्या महिलांसाठी तुम्ही चित्रा वाघ कधीच काही बोलला नाही,’ असे उर्फीने लिहिले आहे.

तसेच तिने आणखी एक पोस्ट करत म्हटले की, हे राजकारणी आणि वकील मुके आहेत का? घटनेत असा कोणताही कायदा नाही, ज्याद्वारे मला तुरुंगात पाठवले जाऊ शकते.

उर्फीने अश्लीलतेची व्याख्या सांगताना लिहिले की, ‘अश्लीलतेची व्याख्या व्यक्तीपरत्वे बदलते. जोपर्यंत माझे प्रायव्हेट पार्ट दिसत नाहीत तोपर्यंत तुम्ही मला तुरुंगात पाठवू शकत नाही. मीडियाचे लक्ष वेधण्यासाठी हे लोक असे करतात. चित्रा वाघ माझ्याकडे तुमच्यासाठी चांगल्या कल्पना आहेत. मुंबईतील मानवी तस्करी, बेकायदेशीर डान्सबार, बेकायदेशीर वेश्याव्यवसाय जे पुन्हा मुंबईत सर्वत्र सुरू आहे, याबाबत काही तरी करावे,’ अशा शब्दांत उर्फीने प्रत्युत्तर दिले आहे.